
तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी
पिंपरी, ता. २० : तरुणाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला.
जेरीजोसेफ अँड्रस (रा. मु. पो. कुंबळी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य दीपक चव्हाण (वय २५, रा. गवळीनगर, भोसरी), ओंकार विधाते, निखिल थेउडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मागील वर्षी भोसरी येथील एका हॉटेलमध्ये कामाला असताना जेरीजोसेफशी ओळख झाली. पुढे त्यांनी भागीदारीत भोसरी येथे कॅफे सुरू केले. कॅफे सुरू होऊन चार महिने झाले तरी आरोपीने फिर्यादीला काहीही हिशेब दिला नाही. त्यामुळे फिर्यादी हे वारंवार आरोपी पार्टनरकडे हिशेब मागत होते. दरम्यान, फिर्यादी हे कॅफे येथे असताना आरोपींनी त्यांना दुचाकीवरून लांडेवाडी झोपडपट्टी येथे नेले. तेथे आरोपी निखिलने, '' तुझा पार्टनर आदित्य याने हॉटेल सुरु करण्यासाठी आमच्याकडून घेतलेले पैसे आम्हाला तू परत दे'' असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर निखिल याने फिर्यादीच्या आईला फोन करून '' आमचे वीस हजार रुपये परत दिले तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडून देऊ'' असे म्हणाला. त्यानंतर परत भोसरीत दिसला तर जीवे मारू, अशी धमकी देत फिर्यादीला पुन्हा भोसरी येथे आणून सोडले.