
गुन्हे वृत्त
कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड लुटली
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून धमकी देत गल्ल्यातील रोकड लुटली. हा प्रकार पिंपरी भाजी मंडई येथे घडला. अण्णा रामा अडागळे (रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरीतील सेमेट्री चाळ येथील दोन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह पिंपरी भाजी मंडईत भाजी विक्री करीत असताना आरोपींनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपये मागितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यास ‘माझ्याकडे आता तुला देण्यासाठी पैसे नाही’, असे सांगितले. एका आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत ‘मला पैसे दे नाहीतर तुला खल्लास करीन, तुला उद्यापासून भाजी विकू देणार नाही’, अशी धमकी देत त्यांच्या कमरेला कोयता लावला. कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीने फिर्यादी यांना ‘आम्ही पैसे घेतले. याबाबत तू कोणाला काही सांगितले तर तुझे हात पाय तोडू’ अशी धमकी देऊन निघून गेले.
--------------------------
नाल्यात राडारोडा टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा
नाल्यात पालापाचोळा व राडारोडा टाकल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दापोडी येथे घडला.
विजय चव्हाण (वय २४, रा. पाषाण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सचिन गुलाबराव जाधव (वय ४३, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमधून आणलेला पालापाचोळा व राडारोडा दापोडी येथील नदी किनाऱ्याजवळच्या नाल्यांमध्ये टाकून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत असल्याचे निर्दशनास आले. त्याच्यावर सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------
बँक मॅनेजर असल्याचे भासवून आॅनलाइन फसवणूक
आयसीआयसीआय बँक मॅनेजर असल्याचे भासवून एकाची ऑनलाइनद्वारे सव्वा दोन लाखांची फसवणूक केली. कृष्णा बालाजी रोडगे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून तो आयसीआयसीआय बँकेचा मॅनेजर असल्याचे भासवले. लोन ईएमआय बाबतची शंका दूर करण्यासाठी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. एनी डेस्क नावाचे स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या बँक खात्याचा इंटरनेट बँकिंग लॉग इन आयडी व पासवर्ड संगणकीय साधनांद्वारे प्राप्त केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून २४ हजारांची रक्कम काढून घेतली. तसेच फिर्यादी यांच्या नावे आयसीआयसी बँकेचे दोन लाखांचे लोन परस्पर मंजूर करून घेतले. ही रक्कम देखील फिर्यादीच्या परवानगीशिवाय परस्पर वळती करून फिर्यादीची दोन लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केली.
--------------------
घरफोडीत दागिने लंपास
लाकडी दरवाजा उचकटून कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने ऐवज लंपास केला. ही घटना बावधन येथे घडली.
चंद्रशेखर मोतीलाल परदेशी (रा. बावधन बुद्रूक, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराशेजारील लाकडी दरवाजा उचकटून व कडी कोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. देवघरातील लोखंडी कपाट उघडून लॉकर तोडून त्यातील रोकड व सोने-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकर तोडून नुकसान केले.
-------------------
तरुणीला मारहाण करीत विनयभंग
तरुणीला मारहाण करून गैरवर्तन करीत विनयभंग केला. तिच्या आई-वडिलांनाही धमकी देत पाठलाग केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार बावधन व नागपूर येथे घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार साजिद अब्दुल रशीद शेख (वय २३, रा. लालगंज राऊत चौक, नागपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी यांच्या मानेवर असलेले व्रण पाहून ‘तुझे कोणासोबत अफेअर आहे का’? असे म्हणत आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन केले. नागपूर येथे जाऊन फिर्यादीच्या आई-वडिलांना धमकी दिली. तसेच फिर्यादी
यांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तसेच प्रत्यक्ष त्यांचा पाठलाग करीत आहे.