बाजारपेठा फुलल्या

बाजारपेठा फुलल्या

पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी
पिंपरी, ता. २१ : मराठी वर्षातील पहिला सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह आहे. घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. त्यानिमित्त गुढी, साखरमाळ आदी पूजा साहित्य खरेदीसाठी मंगळवारी (ता. २१) बाजारपेठेत गर्दी होती. रेडीमेड गुढीला ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
बुधवारी (ता. २२) पहाटेच पूजा करून गुढी उभारायची असल्याने अनेकांनी मंगळवारीच पूजेची सर्व तयारी पूर्ण केली. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग होती. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी वस्त्र, लहान तांब्या, हार-फुले, कडुलिंबाची, आंब्याची पाने, गूळ, साखरमाळा, रांगोळी, पताका व गुढीसाठीची काठीची खरेदी केली जात होती. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड, रहाटणी, काळेवाडी, पुनावळे आदी ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दी होती. कुटुंबीयांसह पूजा साहित्य खरेदीसाठी येत होते.
या मुर्हूतावर सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल, शोरूम, ज्‍वेलर्स तसेच कपड्यांच्या दुकानांतही विशेष सवलती दिल्या. वाहन खरेदीसाठीही गर्दी होती. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल दिसून आली.

विविधरंगी साखरमाळ
पारंपरिक सजावट केलेल्या रंगीबेरंगी रेडीमेड गुढी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होत्या. रेडीमेड गुढीला ग्राहकांची अधिक पसंती होती. उंचीनुसार त्याचे दर आकारले होते. तसेच साखरमाळाही विविध रंगामध्ये उपलब्ध होत्या. केशरी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगांच्या साखरमाळांना मागणी होती. २० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत दर होते.

पावसाचा अंदाज घेऊन पडले घराबाहेर
शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मंगळवारीही ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या. यामुळे अनेकजण पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडत होते.

मंदिरांना रोषणाई, सजावट
शहरातील विविध भागातील मंदिरांना गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच रोषणाई व सजावट करण्यात आली. आकुर्डीतील श्री खंडोबा मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तळवडेतील श्री ज्योतिबा मंदिर, देहूतील श्री संत तुकाराम महाराज मंदिर, आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, चिंचवडगावातील श्रीमन महासाधू मोरया गोसावी मंदिर यासह इतर मंदिरांमध्येही सजावटीची लगबग सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com