
पिंपरी महापालिकेतील लिपिकाला एक लाखाची लाच घेताला पकडले
पिंपरी, ता. २१ ः ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिकास ताब्यात घेतले आहे. महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भावशिंग आडे (वय ५१) असे ताब्यात घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल- दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदाराने तक्रार केली होती. त्यांना निविदेनुसार काम मिळाले होते. त्या कामाच्या वर्क ऑर्डरची फाइल तयार करण्यासाठी एक लाख पाच हजार रुपयांची लाच आडे मागत असल्याची तक्रार आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत सापळा लावला. तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारताना आडे याला ताब्यात घेतले. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
प्रशासकांचे स्पष्टीकरण
कोणी लाच मागत असल्यास नागरिकांनी संबंधितांविरुद्ध तक्रारी करायला हव्यात. तक्रारी करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढील महिन्यात बदल्या केल्या जातील, असे महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.