
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तळेगाव दाभाडे वर्षप्रतीपदा उत्सव
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३१ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांचा विचार कृतीवर होता आणि त्यातून त्यांनी छोट्या गोष्टीतून सहकाऱ्यांवर संस्कार केले. संघाचा संप्रदाय त्यांनी कधी होऊ दिला नाही. हिंदू समाज पासून आपले अस्तित्व वेगळे आहे असे कधी संघाने दाखवून दिले नाही. राष्ट्रभक्ती निर्माण आणि संस्कारक्षम व्यक्ती निर्मिती याकामावरच त्यांनी आयुष्यभर काम केले. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा तरुण व्यवसायी प्रमुख अभिजित शिंदे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तळेगाव दाभाडे वतीने वर्षप्रतीपदा उत्सव या कार्यक्रमाचे यशवंतनगर मधील गोळवलकर गुरुजी मैदान येथे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे सुनील जैन, पुणे जिल्हा कार्यवाह हेमंत दाभाडे, तळेगाव शहर कार्यवाह राहुल जांभूळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुनील जैन यांनी मनोगत व्यक्त केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हेडगेवार भवन याठिकाणी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या वतीने पूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी उपस्थितांना संबोधित केले.