नववर्षांचे उत्साहात स्वागत 
ढोल ताशांच्या गजरात निघाल्या स्वागत यात्रा

नववर्षांचे उत्साहात स्वागत ढोल ताशांच्या गजरात निघाल्या स्वागत यात्रा

पिंपरी, ता. २१ ः हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा नागरीकांनी बुधवारी उत्साहात साजरा केला. सकाळी लवकर घरावर गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. शहरातील विविध संघटनांतर्फे मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशांचा दणदणाट, भगवे फेटे, दुचाकी, चारचाकीसह दिमाखदार मिरवणुका राहिल्‍या. विविध भागांत सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यांच्या मैफलीही रंगल्या. सोशल मिडीयावर शुभेच्छांची देवाणघेवाण दिवसभर होती.

घरोघरी उभारलेल्या गुढ्यांमुळे दिवसभर वातावरण प्रसन्न व उत्साहीदायी होते. दुपारी गोडधोड जेवण झाल्यानंतर कुटुंबे खरेदीसाठी बाहेर पडली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सर्वत्र गर्दी होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संसारोपयोगी साहित्य, सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. नवी वाहने मुहूर्तावर घरी आणली. नवी वास्तू, दुकानांमध्ये प्रवेश-बुकिंगही झाले.

‘भारतीय संस्कृती मंच’तर्फे यमुनानगरमधील अष्टविनायक मंदिर ते श्री दत्तमंदिर चौकादरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. याठिकाणी गुढी उभारून पाडवा साजरा करण्यात आला. शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या वेशात चिमुकले सहभागी झाले होते. भगवे फेटे बांधून मार्गावर ठिकठिकाणी महिला फुगड्या खेळत होत्या. केरळी वाद्यवृंदाने यात्रेची शोभा वाढवली. पंजाबी बांधव सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्या याशिवाय, इस्कॉन मंदिराचा भव्य रथ, समरसता रथ, यासह बँड, ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन सहभागी झालेल्या युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दत्त मंदिराजवळ यात्रेचा समारोप झाला.


जाधववाडीत समानतेची गुढी
छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्यावतीने चिखली-जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परंपरेची, पर्यावरण जागृतीची, समानातेची गुढी उभारली. साडेतीन मुहूर्तांवर जनसेवा पाणपोई व वाचनालय सुरू केले. पेढे वाटप करून जोरदार स्वागत केले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक ढोबळे, निलेश गायकवाड, ऋषिकेश बाबर, गणेश पांडे, गंगाधर डांगे ,आदेश घोडके, सुनिता केदार, ज्ञानेश्वर गायकवाड, कुणाल जाधव, रुपेश डुकरे उपस्थित होते.


-ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
-विद्यार्थ्यांचे मराठमोळ्या वेशभूषेत अत्यंत शिस्तबद्ध लेझीम प्रात्यक्षिके
-संपूर्ण यात्रा मार्गात महिलांचा फुगडी खेळत सहभाग
-विविध वेशभूषा केलेली विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते
-यात्रा मार्गात चित्र रथांबरोबरच ढोल ताशांच्या गजराने उत्साह पूर्ण व मंगलमय वातावरण निर्मिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com