गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीत उत्साह
सोने, चांदीची नाणी, दागिन्यांना ग्राहकांकडून प्राधान्य

गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीत उत्साह सोने, चांदीची नाणी, दागिन्यांना ग्राहकांकडून प्राधान्य

पिंपरी, ता. २२ ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी तब्बल साठ हजारांवर गेलेला सोन्याचा भाव आज गुडीपाडव्याच्या दिवशीच घसरला. या दिवशी सोने खरेदीला मोठे महत्त्व असते. बुधवारी या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने, चांदीची खरेदी करत, परंपरा कायम राखली.
ग्राहकांची सकाळपासूनच सराफी पेढ्यांमध्ये वर्दळ दिसत होती, तर सायंकाळीही अनेक दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते. सोने, चांदीची नाणी, बिस्किटे याबरोबरच येऊ घातलेल्या लग्नसराईसाठी दागिन्यांच्या खरेदीलाही शहरवासीयांनी पसंती दिली.
सतत सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करतील का नाही, अशी काही अंशी धाकधूक सराफी पेढ्यांमध्ये दिसून येत होती. मात्र, शहरवासीयांकडून यंदाच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनपसंत खरेदीला पसंती मिळत आहे. या मुहूर्तावर सोने -चांदीची खरेदी केली गेली तर वर्षभर भरभराट व प्रगती होते, असे सांगितले जाते. म्हणून या दिवशी आवर्जून ही खरेदी केली जाते. बुधवारी या मुहूर्तावर सोने - चांदीचे शिक्के, बिस्किटे, दागिने यांची खरेदी केली गेली. विशेष म्हणजे, गतवर्षापेक्षा सोने खरेदीची संधी नागरिकांना मिळाल्याने सराफी पेढ्या सकाळपासून गजबजलेल्या होत्या.

सोन्याचे २०२३ मधील दर

आज (ता. २२) शुद्ध सोन्याच्या दरात प्रतिग्राम ५७४ रुपयांची घट झाली. शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ५८ हजार ६१४ रुपयांवर खुला झाला आहे. हा दर काल मंगळवारी प्रति १० ग्रॅम ५९,१८८ रुपयांवर होता. तर गेल्या सोमवारी सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केला होता. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

आगाऊ बुकिंगवर भर
विशेष म्हणजे या वर्षी प्रत्येक मुहूर्तापूर्वी सोन्याचे दागिने, चोख सोने यांची आगाऊ बुकिंग करून, मुहूर्तावर त्याची डिलिव्हरी करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आजच्या मुहूर्ताचेदेखील जवळपास ५० टक्के आगाऊ बुकिंग नागरिकांनी करून ठेवले होते.

सोन्याचा आज खुला झालेला दर
शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ः ५८,६१४रुपये
२३ कॅरेट ः ५८,३७९ रुपये,
२२ कॅरेट ः ५३,६९० रुपये
१८कॅरेट ः ४३,९६१ रुपये
१४ कॅरेट ः ३४,२८९ रुपये
चांदीचा दर प्रति किलो ः ६८,२५० रुपये


‘‘ग्राहकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या मुहुर्तावर मिळाला आहे. लग्न सराई पाहता मंगळसूत्र, पाटल्या यांना विशेष मागणी होती. आमच्याकडे मंगळसूत्र महोत्सव आणि बॅंगल्स महोत्सव सुरू आहे. यात नागरिकांकडून पारंपारिक दागिन्यांना मोठी पसंती दिली आहे. खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह खूप आहे. सोन्यामधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनीदेखील खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
-तेजपाल रांका, संचालक रांका ज्वेलर्स, चिंचवड

३२१६२, ६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com