
प्रतिक्षा सक्षम बीआरटीची...
लिड
पुणे-मुंबई महामार्गासह लोहमार्ग व पवना नदी ओलांडण्यासाठी नाशिक फाटा व चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट सोसायटीतून पुलांची उभारणी केली. प्रशस्त रस्त्यांची निर्मिती झाली. त्यामुळे शहराच्या पूर्व व पश्चिम भागाची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढली. या दोन्ही मार्गांसह महामार्ग व औंध-रावेत-किवळे रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात बीआरटीएस सेवा सुरू केली. पाच सप्टेंबर २०१४ रोजी शहरातील पहिली बीआरटी बस स्वतंत्र मार्गाने धावली. कालांतराने पाच बीआरटी मार्ग तयार झाले. मात्र, प्रवाशांना सक्षमपणे बीआरटी बस सुविधा अद्याप मिळालेली नाही. अनेक अडथळे आहेत. त्याचा मार्गनिहाय घेतलेला आढावा आजपासून...
---------------------------------------------------
दापोडी-निगडी मार्गाला मेट्रोमुळे ‘वळणे’
पुणे-मुंबई महामार्गावरील स्थिती; इन-आऊट मार्गिकांतूनही चुकीच्या दिशेने घुसखोरी
पिंपरी, ता. २३ ः मुंबई-पुणे महामार्ग हा शहरातील महत्त्वाचा मार्ग आहे. त्यावर निगडी ते दापोडीपर्यंत बीआरटी मार्ग आहे. मात्र, पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो मार्ग उभारल्याने बीआरटी बस काही ठिकाणी महामार्गाच्या मुख्य मार्गिकेतून, काही ठिकाणी बीआरटी मार्गातून तर काही ठिकाणी सेवा रस्त्यावरून धावत आहेत. निगडी-पिंपरीच्या दरम्यान खासगी वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे तर पिंपरी-दापोडी दरम्यान मेट्रोमुळे ‘वळणे’ घेऊन मार्ग काढावा लागत आहे.
दापोडीपासून कासारवाडीपर्यंत बीआरटी मार्ग आहे. कासारवाडीपासून नाशिक फाटापर्यंत बीआरटीच्या मार्गिकेच्या जागेवर मेट्रोचे खांब उभारल्याने बीआरटी थांबा अनावश्यक ठरला आहे. बस सेवा रस्त्यानेच धावतात. नाशिक फाटा येथून निगडीपर्यंत बीआरटी मार्ग आहे. शिवाय, निगडीकडून पुण्याच्या दिशेने नाशिक फाटा-कासारवाडीपर्यंत बस बीआरटीतून जाते. कासारवाडीपासून दापोडीपर्यंत मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्ग बंद आहे. त्यामुळे कधी बीआरटीतून तर, कधी सेवा रस्त्याने अशी ‘वळणे’ घेत बस जाते. शिवाय, ‘इन-आउट पंचिंग’च्या काही ठिकाणी बहुतांश वाहनचालक ‘इन’च्या ऐवजी ‘आऊट’ व ‘आऊट’ऐवजी ‘इन’ मार्गिकेतून वाहने नेतात. काही जण बीआरटीतूनच वाहने दामटतात. त्यामुळे अपघाताचा धोकाही संभवतो.
दोन थांब्यांमुळे गैरसोय
‘‘मला रहाटणीला जायचे आहे. एका व्यक्तीला बसबाबत विचारले, त्यांनी बीआरटी थांब्यावर जायचे सांगितले. सर्विस रोडवरील थांब्यावरून चौकात जाऊन पादचाऱ्यांच्या मार्गिकेतून थांब्यावर पोहोचले. थोड्या वेळाने रहाटणी- पिंपळे सौदागर असो बोर्ड असलेली बस आली. पण, ती बीआरटी थांब्यावर न येता सर्विस रोडने निघून गेली. त्यावेळी एका मुलीने सांगितले की, बीआरटी स्टॅंडवर फक्त चिंचवड, निगडीला जाणाऱ्या बस येतात. तुम्ही समोरच्या सर्विस रोडच्या स्टॅंडवर जा. पुन्हा मार्गिकेतून चौकात गेले व सर्विस रोडच्या स्टॅंडवर आलेय. आता बसची वाट बघतेय,’’ हा अनुभव आहे, वाशिमवरून नोकरीनिमित्त शहरात आलेल्या पायलचा. अशाच परिस्थितीला अनेक प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. कारण, मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी चौक) व पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौक) निगडी व पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने पीएमपीचे प्रत्येकी चार थांबे आहेत. चार थांबे बीआरटी मार्गावर व दुसरे चार सेवा रस्त्यावर आहेत. त्यामुळे कोणत्या बस बीआरटीतून जातात आणि कोणत्या सेवा रस्त्याने जातात हे लक्षात येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
उपाय ः पिंपरी चौकातून पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरीगावात जाणाऱ्या बस एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाणपूल) ये-जा करतात. त्यांच्यासाठी पिंपरी व मोरवाडी चौकात असे दोन थांबे आहेत. त्या बस सेवा रस्त्याने धावतात. त्याऐवजी बीआरटी मार्गातून गेल्यास दोन्ही थांब्यावर थांबून एएसएम महाविद्यालयासमोरील आउट मार्गिकेतून सेवा रस्त्यावर येऊन सुमारे पाचशे मीटर पुढे पुलावरून निश्चित ठिकाणी जाऊ शकतात. त्या बस परत पिंपरी चौकात येताना चिंचवड स्टेशन येथून यू-टर्न घेऊन सेवा रस्त्याने येतात. त्या ऐवजी परतीचा मार्गही बीआरटीतून केल्यास प्रवाशांच्या सोयीचे ठरेल, अशी स्थिती आहे.
---
फोटो ः 32287