
सलून दुकानाची तोडफोड; चिखलीत एकाला अटक
पिंपरी : सलून दुकानात चेहरा फ्रेश केलेल्या कामाचे पैसे मागितले असता सलून चालकाला बेदम मारहाण केली. दुकानातील साहित्याची तोडफोड करून गल्ल्यातील रोकड लुटल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिखली येथे घडली. भूषण लक्ष्मीकांत महाले (रा. कृष्णानगर सोसायटी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श ऊर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय २२, रा. पंचवटी हाउसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य शिंदे (रा. शरदनगर, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे शरदनगर येथील स्वामी विवेकानंद पुलाजवळ सलूनचे दुकान आहे. ते दोन कामगारांसह दुकानात असताना आरोपी तेथे आले. आरोपी आदित्यने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने आरोपीचा चेहरा फ्रेश करून दिला. या कामाची वीस रुपये फी फिर्यादीने आरोपीकडे मागितली असता त्यांना ‘तू माझ्याकडे पैसे मागतोस का, तू आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो’ अशी आरोपीने धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, आदर्शने दिलेल्या लोखंडी पाइपने दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. दोघांनी दुकानातील गल्ल्यातील चौदाशे रुपयांची रोकड चोरली. ‘पोलिस कम्प्लेंट केली तर तुझी विकेट टाकीन’, अशी धमकी आदर्श याने दिली.
पुनावळेत अपहारप्रकरणी एकावर गुन्हा
अपहरणप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार पुनावळे येथे घडला. राज शेख महम्मद (रा. देहूगाव) असे आरोपीचे नाव आहे. करुनेश सुरेश वर्मा (रा. खारघर, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे चलाख म्हणून काम करीत असताना त्यास वाहनात डिझेल भरण्यासाठी बीपीसीएल (स्मार्ट कार्ड) दिले होते. नोकरी सोडल्यानंतर फिर्यादीचे कार्ड परत न करता स्वतःकडे ठेवून गैरवापर करीत ३० हजार ७५० रुपयांचा अपहार केला.
मोशीतून ऐवज लंपास
उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने दोन लॅपटॉप व एक मोबाईल लंपास केला. हा प्रकार मोशी येथे घडला. अमोल झुंबरसिंग राठोड (रा. ओम साई रेसिडेन्सी,गायकवाड वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरवाजाला कडी लावलेली नसताना उघड्या दरवाजावाटे चोरटा घरात आला. दोन लॅपटॉप, एक मोबाईल, लॅपटॉपची बॅग व कागदपत्रे असा एकूण ४५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.
लष्करातील निवृत्त सुभेदार यांच्या घरी चोरी
दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदार यांच्या घरी चोरी केली. हा प्रकार देहूरोड येथे घडला. लक्ष्मीप्रसाद सुकईप्रसाद कुशवाहा (रा. वृंदावन सोसायटी, बँक ऑफ इंडियाच्या मागे, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. त्यानंतर बेडरूमचा कडी कोयंडा तोडून सोने-चांदीचे दागिने व रोकड चोरली.
पत्नी व मेहुण्याकडून बेदम मारहाण
पत्नी व मेहुण्याने एकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला. सुरेश शंकर जुनवणे (रा. जगताप डेअरी चौक, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मेहुणा सोमनाथ अशोक तांबे (वय ३५, रा. मधुबन कॉलनी, वाकड) व पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची पत्नी व मेहुणा यांनी फिर्यादीच्या दुकानाची जागा बळकाविण्यासाठी त्यांना दुकानाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यास फिर्यादी यांनी नकार दिल्याने मेहुण्याने दांडक्याने तर पत्नीने पाइपने मारहाण केली.
पिंपरीत महिलेला जिवे मारण्याची धमकी
फोनवरून महिलेला जिवे मारण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. किल्या ऊर्फ किरण कापसे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने मोबाईलवरून फिर्यादी महिलेला फोन केला. त्यांना जिवे मारण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.