‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ कायम
‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ कायम

‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ कायम

sakal_logo
By

‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ कायम

महापालिकेतील आर्थिक देवाण-घेवाणीतून शहराची होतेय बदनामी

पिंपरी, ता. २३ ः ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महापालिका पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यामुळे महापालिकेतील गैरव्यवहार, आर्थिक देवाण-घेवाण, कामांची टक्केवारी असे मुद्दे पुन्हा चर्चेत आले. त्याअनुषंगाने पैसे का मागितले जातात, का दिले जातात, न दिल्यास काय होते, दिल्यास काय होते, तक्रारी का होतात, झाल्यास काय होते, लाच देव-घेवला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पहिला छापा १९९७ मध्ये पडला. तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेत ३३ वेळा कारवाई झाली. दोषींविरुद्ध गुन्हे दाखल झाले. अटक झाली. काहींना शिक्षा झाली. काही निर्दोष सुटले. कामावर पुन्हा हजर झाले. तरीही आर्थिक देवाण-घेवाणीच्या घटना घडत आहेत, त्यावरून ‘लाच’ प्रकाराची ‘खोली’ स्पष्ट दिसते. मात्र, प्रामाणिक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडेही स्वंशयित नजरेने पाहिले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत मंगळवारी केलेली कारवाई ही तीन वर्षातील तिसरी कारवाई आहे. त्यातील एक कारवाई पदाधिकारी कार्यकालातील २०२१ मधील आहे. तर, दोन कारवाया प्रशासकीय कार्यकालातील २०२२ व २०२३ मधील आहेत. लोकप्रतिनिधींच्या काळात ‘टक्केवारी’ शब्द ‘तेजीत’ असतो. ‘त्या’वरून दोन वर्षांपुर्वी दोन पदाधिकाऱ्यांनी एका पदाधिकाऱ्याला त्यांच्याच दालनात मारहाण केल्याची घटनाही घडली होती. यावरून महापालिकेचे कारभारी लोकप्रतिनिधी असोत की प्रशासकीय, ‘लाच’ दिली-घेतली जात असल्याचे अधोरेखित होते. शासकीय अधिकारी बदली होऊन येतात आणि जातातही, पण नागरिक, ठेकेदार आणि महापालिका सेवेतील अधिकारी- कर्मचारी तिथेच असतात. उरतो फक्त एकच प्रश्न ‘लाच’ का दिली-घेतली जाते. त्यामुळे शहराची परिणामी महापालिकेची बदनामी होते, ती कधी थांबणार...

असे प्रसंग, अशा घटना
एक
साहेब, तुमची महापालिकेत ओळख आहे ना? मग माझं एक काम कराना! तुमचा संदर्भ मला पुण्यातील .. यांनी दिलाय. मी कंत्राटदार आहे. सध्या माझं काम विदर्भात सुरू आहे. पण, मला पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेश करायचा आहे. त्यासाठी मी टेंडर भरलंय. पण, संबंधित अधिकाऱ्याशी ओळख नाही. तुम्ही भेट घालून द्या ना! त्यांचं काय असेल ते आपण देऊ! असे चारचाकीतून आलेली व्यक्ती सांगत होती, असे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. त्या कंत्राटदाराला, ‘मी आजपर्यंत कुणाला पैसे दिले-घेतले नाहीत. तुझ्यात क्वॉलिटी असेल तर काम मिळेल,’ असे म्हणून मी त्याला हुसकवून लावला. तेव्हापासून मला त्याचा फोन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन
दिवाळीच्या आधी एक व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये आली. नेहमीप्रमाणे माझे काम सुरू होते. त्यांनी एक कागदाचे पाकिट माझ्या टेबलवर ठेवले. त्याला, ‘काय आहे?’ असे विचारले. त्यावर त्याने ‘दिवाळी गिफ्ट’ असल्याचे सांगितले. ‘साहेबांची आज रजा आहे. नंतर या!’ असे मी त्यांना सांगितले. ती व्यक्ती म्हणाली, ‘साहेबांसाठी नाही, तुमच्यासाठी आमच्या साहेबांनी गिफ्ट पाठवलंय!’ मी पाकिटात पाहिले. त्यात काही रक्कम होती. त्या व्यक्तीला स्पष्टपणे नकार दिला. त्याचे गिफ्ट घेतले नाही. तेव्हापासून ती व्यक्ती समोर आली तरी, माझी नजर चुकवून निघून जाते,’ महापालिकेच्या एका महत्त्वाच्या विभागात लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याचे हे शब्द आहेत.

काही आरोप अन् चौकशी
- कोरोना काळात वैद्यकीय व आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या एका संस्थेच्या बिलांवरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर आरोप झालेत. त्यांची चौकशी झाली. नंतर बदलीही झाली. प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.
- एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यासह दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट बॅंक खात्यावर पैसे स्विकारल्याचे आरोप झाले. त्यात एंट्रीही दिसल्यात. त्या प्रकरणाचीही चौकशी झाली अन् अधिकारी सेवानिवृत्त.
- दोन वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी दोन अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केले. पुढे महापालिकेची मुदत संपल्याने पदाधिकारी माजी झाले. एका अधिकाऱ्याची बदली झाली, एक महापालिकेतच आहे.

लाचलुचपत प्रतिबंधकसाठी हेल्पलाइन
टोल फ्री क्रमांक ः १०६४
दूरध्वनी क्रमांक ः ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
व्हॉटस्ॲप क्रमांंक ः ७८७५३३३३३३
ई-मेल आयडी ः dyspacbpune@mahapolice.gov.in
संकेतस्थळ ः www.acbmaharashtra.gov.in
|ऑनलाइन ॲप ः www.acbmaharashtra.net.in