
देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये श्रीरंग बारणे लोकसभेत ५०८ प्रश्न विचारुन पटकाविले दुसरे स्थान
पिंपरी, ता. २३ : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे ‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या ‘टॉप-टेन’मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. १४८ वेळा चर्चेत सहभाग आणि ५०८ प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.
देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मूल्यांकन केले जाते. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादीत आहेत.
खासदार श्रीरंग बारणे यांची सभागृहातील उपस्थिती ९४ टक्के असून, दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सातवेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरम्यान; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहेत. तर, शिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.
‘‘मावळच्या जनतेने माझ्यावर सलग दोनवेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे कामकाज करत आहे. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. पहिल्या दहा खासदारांमध्ये दुसरा क्रमांक आल्यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ.
फोटोः 32376