
तक्रारअर्ज, नव्हे पोलिसांचे कौतुक करणारे पत्र ज्येष्ठ दांम्पत्याचा सुखद अनुभव, पासपोर्टसाठी पोलिसांकडून मदतीचा हात
पिंपरी, ता. २३ : पोलिस ठाणे, आयुक्तालय म्हटले की, तक्रार अर्ज येत असतात. तक्रारीची दखल न घेतल्यास, न्याय न मिळाल्यास वरिष्ठांकडे धाव घ्यावी लागते. मात्र, पासपोर्ट कामा दरम्यान ज्येष्ठ दाम्पत्याला एक वेगळाच अनुभव आला. पोलिसांनी आस्थेवाईकपणे चौकशी करीत केलेली मदत अन् अल्पावधीतच मिळालेला पासपोर्ट, अशा सुखद अनुभवावरून या दांपत्याने यंत्रणेचे कौतुक केले. पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आभारही मानले.
श्रीधर परांगुसम (वय ६९) व संजीवनी श्रीधर (वय ६८) हे दांपत्य बावधन येथे वास्तव्यास आहे. श्रीधर हे सीडीए सदर्न कमांड या केंद्रीय सेवेतून तर संजीवनी या बीएसएनएलमधून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात असून, या दोघांनाही त्याच्याकडे जायचे आहे. श्रीधर यांना काही महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. अनेकदा व्हील चेअरचा आधार घ्यावा लागतो. दरम्यान, परदेशात मुलाकडे जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असल्याने त्यांनी यासाठी अर्ज केला.
त्यांची फाइल पोलिस व्हेरीफिकेशनसाठी आयुक्तालयातील पासपोर्ट व्हेरिफिकेशन विभागात आली. दरम्यान, ही फाइल पुढे कधी जाणार व पासपोर्ट कधी मिळणार, याबाबत संजीवनी यांना माहिती मिळत नसताना आयुक्तालयातून त्यांना सविस्तर माहिती दिली. व्हेरिफिकेशनही तत्काळ करीत ही फाइल आता कुठे आहे, येथून पुढे कुठे जाईल आदी सर्व माहिती देऊन सर्वतोपरी मदत केली. यामुळे अल्पावधीतच त्यांना पासपोर्ट मिळाला. अन लेकाला भेटण्यासाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
पोलिसांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद व त्यांनी केलेली मदत याबद्दल संजीवनी यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना पत्र लिहून त्यांच्या सर्व यंत्रणेचे कौतुक करीत आभारही मानले.
मानसिक आधार
पोलिस यंत्रणा असो की, इतर सरकारी कार्यालयातील काम असो ‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ असे कटू अनुभव अनेकांना येत असतात. मात्र, या दांम्पत्याबाबत काहीसे वेगळे अन सुखद घडले. आजींची धडपड पाहून श्रीधर यांचे पासपोर्ट संदर्भातील काम तत्काळ करून त्यांना कोणताही त्रास होणार याची खबरदारी घेतली. मानसिक व शाब्दिक आधार दिला.
-----------
पासपोर्ट कामासंदर्भात चौकशी केली असता, अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती देत सर्व मदत केली. आम्ही सर्वजण आपणास सर्व सहकार्य करू, असे विश्वासपूर्वक सांगितले. हा एक अतिशय सुखद अनुभव होता. याची आपल्या कार्यालयात नोंद व्हावी, या हेतूने हे पत्र लिहीत आहे. आम्ही आपल्या सर्व सहकाऱ्यांचे ऋणी आहोत.
- संजीवनी श्रीधर, बावधन.
----------------------------