निक्षय मित्रांनी दत्तक घेतले ७०० क्षयरूग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निक्षय मित्रांनी दत्तक घेतले ७०० क्षयरूग्ण
निक्षय मित्रांनी दत्तक घेतले ७०० क्षयरूग्ण

निक्षय मित्रांनी दत्तक घेतले ७०० क्षयरूग्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता.२४ ः केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी समाजाचाही सहभाग वाढावा या हेतूने ‘निक्षय मित्र’ ही संकल्पना पुढे आली आहे. यातूनच
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ७०० क्षयरुग्णांना १२५ निक्षय मित्रांनी दत्तक घेवून सहा महिन्यांपर्यंतचे अन्नधान्य, तसेच इतर मदत स्वखर्चातून करत आहेत.

शासनाने ‘निक्षय’ पोर्टल सुरू केले आहे. त्याव्दारे आतापर्यंत १२५ निक्षय मित्रांची नोंदणी झाली आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना किंवा कंपनी हे काम करू शकते. त्यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार, निदान सुविधा, व्यावसायिक पुनर्वसनासाठी मदत करणे अपेक्षित आहे. त्यांनी दत्तक घेतलेल्या रुग्णांना दरमहा सोयाबीन, गहू, तांदूळ, शेंगदाणे व खाद्यतेल यांचा समावेश असलेले किट दिले जाते. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रोटिन पावडर दिली जाते.

शहरात उपचाराधिन १४५० रुग्ण आहेत. त्यातील ७०० जणांच्या पोषण आहाराची जबाबदारी निक्षय मित्रांनी घेतली आहे. अद्याप ७५० हून अधिक जणांच्या पोषण आहाराची व्यवस्था होणे बाकी आहे. त्यासाठी या उपक्रमात उद्योगसमूह, सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. इच्छुकांनी आभासी प्रणालीच्या माध्यमातून निक्षय मित्रासाठी नोंदणी करून क्षयरुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी केले आहे.
--
पोषक आहार नसणाऱ्या व्यक्तींना क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते. या आजाराच्या रुग्णांना किमान सहा महिने औषधोपचार घ्यावा लागतो. त्यासाठी शहर क्षयरोग कार्यालयाने व्यवस्था केली आहे. रुग्णांना शासनाकडून महिना ५०० रुपये असे सहा महिन्यांसाठी तीन हजार रुपये आहार भत्ता दिला जातो.

शहरातील बारा सरकारी अधिकारी-कर्मचारीदेखील निक्षय मित्र झाले आहेत. क्षयरोग कार्यालयातील डॉक्टर, परिचारिका, पर्यवेक्षक व इतर कर्मचारीसुद्धा मित्र म्हणून कार्य करत आहेत. एका शाळेने १३ रूग्ण दत्तक घेतले आहेत.