गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

गुन्हे वृत्त

किरकोळ कारणावरून तरुणाला
भोसरीमध्ये बेदम मारहाण

पिंपरी, ता. २४ : किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला.
सौरभ अंकुश खानेकर (रा. खंडोबा माळ, गजानन हौसिंग सोसायटी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी शेटे (रा. दिघी रोड , भोसरी) व कुणाल आकलाडे (रा. खंडोबा माळ, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांचा मित्र जगदीश श्रीवास्तव यांच्यासह दिघी रोड येथील भोसरी विरंगुळा केंद्र येथे गप्पा मारत असताना आरोपी तेथे आले. फिर्यादी यांना ''तू विराज फुगे याच्या गोठ्यावर का येत नाही,'' असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी यांनी जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता, सनी याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला.
-----------------

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली. गौरव संजय दीपक (वय २६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोपट अभिमान आठवले (रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. गौरव व त्याची मैत्रीण हे दुचाकीवरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याहून आकुर्डीकडे येत होते. दरम्यान, आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गौरव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची मैत्रीण किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
-----------------------

भोसरीतील घरफोडीत ऐवज लंपास
घरफोडीत ३५ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना भोसरी येथे घडली. मंगेश युवराज कदम (रा. रानतारा कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------

गोळीबार प्रकरणी एकाला अटक
गोळीबार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता गॅंगमधील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई चऱ्होली येथे करण्यात आली.
हरिओम पांचाळ (वय २०, रा. वडगाव रोड, आळंदी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धेश गोवेकर (रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे चऱ्होली येथील बीआरटी रस्त्याने जात असताना पांचाळ हा त्याच्या साथीदारासह आला. फिर्यादीचा पाठलाग करून, पांचाळ याने फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो पसार झाला. पोलिस शोध घेत असताना, हा आरोपी दुचाकीवरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तो अलंकापुरम रोड वडमुखवाडी ते खडी मशीनकडे जाणाऱ्या रस्त्याने जाणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार मुन्ना शेख (रा. काळे कॉलनी, चऱ्होली) याच्यासह केल्याची कबुली दिली. पांचाळ याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, एक जिवंत काडतूस तसेच एक मोबाईल जप्त केला.