दुकानदाराच्या ध्यानी‘मनी’ केवळ ‘ब्लॅक मनी’

दुकानदाराच्या ध्यानी‘मनी’
केवळ ‘ब्लॅक मनी’

‘‘हे नाणं चालणार नाही म्हणजे काय? आम्ही काय बुंदीसारखी नाणीही घरी पाडतो काय? का आम्ही घरी टांकसाळ उघडली आहे? कालही तुम्ही मला दहा रुपयांची नोट फाटकी आहे म्हणून परत करत होतात. आम्ही नोटा काय घरी छापतो काय?’’ नारायणरावांनी दुकानदारावर नारायणअस्त्र फेकले. दहा रुपयांचे नाणे झिजलंय म्हणून परत केल्यामुळे नारायणराव चिडले होते.
‘‘तुम्ही बुंदी घरी पाडता?’’ दुकानदाराने कुतूहलाने विचारले.
‘‘आम्ही बुंदी पाडू नाहीतर गूळ पाडू, तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? तुम्ही तुमच्या घरी कशाचा फडशा पाडता, हे आम्ही विचारलंय का?’’ नारायणरावांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी दहा रुपयांचे नाणे बोटांच्या चिमटीत पकडलं आणि खाली जमिनीवर टाकलं.
‘‘नीट बघा. दहा रुपयांचे नाणं ‘चालतंय’ की नाही ते.’’ नाण्याकडे बोट दाखवत नारायणरावांनी म्हटले.
‘‘अहो, तसं नाणं चालून उपयोगाचं नाही. ते झिजलं असल्यामुळे चालणार नाही.’’ दुकानदाराने खुलासा केला.
‘‘तुम्ही दिवस- रात्र एवढे काबाडकष्ट करून, मुलांसाठी एवढे झिजता. काही वर्षांनी तुमच्या मुलांनी ‘झिजलेले आईवडिल नकोत’ असे म्हटले तरी चालेल का? झिजलेलं चंदन तुम्हाला चालतं तर झिजलेलं नाणं का चालत नाही? हे नाणं चालण्यासाठी आम्ही आमच्या चपला झिजवू पण ते चालवूनच दाखवू.’’
नारायणरावही हट्टाला पेटले होते. पण तरीही दुकानदार आपल्या निर्णयावर ठाम होते.
‘‘तुम्ही न झिजलेली नाणी तरी घेणार का?’’ नारायणरावांनी म्हटले.
‘‘न झिजलेली नाणी नक्की घेणार.’’ दुकानदाराने असे म्हटल्यावर नारायणरावांनी खिशातून एक पुरचुंडी काढली. त्यात चार आणे व आठआण्याची चिल्लर होती.
‘‘आता ही नाणी अजिबात झिजलेली नाहीत. ही नाणी घेऊन मला वाणसामान द्या.’’ नारायणरावांनी म्हटले.
‘‘अहो, ही नाणी आता चालत नाहीत.’’ दुकानदाराने डोक्यावर हात मारला.
‘‘पण ही नाणी कोठे झिजली आहेत? त्यामुळे तुम्हाला ती घ्यावी लागतील.’’ नारायणरावही आता इरेला पेटले होते.
‘ही नाणी चलनात नसल्याने ती घेणार नाही.’ यावर दुकानदार ठाम होते. बराचवेळ दोघांमध्ये वाद सुरू होता. थोड्यावेळाने
नारायणरावांनी माघार घेतली व दुकानदाराच्या कानाशी लागले.
‘‘माझ्याकडे ब्लॅक मनी आहे. घेता का?’’ नारायणरावांनी म्हटले. त्यावर दुकानदाराने कान टवकारले.
‘‘घेतो पण कमिशनवर. तुमचा सगळा ब्लॅक मनी मी व्हाईट करून देतो. ’’ दुकानदाराने उत्सुकतेने म्हटले.
‘‘पण तुमच्यावर मी विश्‍वास ठेवू शकत नाही. आपल्या दोघांमध्ये एक लेखी करार करू या.’’ नारायणरावांनी असं म्हटल्यावर दुकानदारानेही मान्यता दिली.
त्यानंतर दोघेही दुकानाच्या आतल्या खोलीत गेले. एका कागदावर त्यांनी करार केला. ‘‘माझ्याजवळील सगळा काळा पैसा, मी आपणाकडे देत आहे. त्या बदल्यात तुम्हाला पंधरा टक्के कमिशन दिले जाईल.’’ यावर दोघांनीही सह्या केल्या.
‘‘मी आता घरून सगळा ‘ब्लॅक मनी’ घेऊन येतो.’’ नारायणरावांनी असं म्हटल्यावर दुकानदाराने ‘सावधपणे घेऊन या. या कानाची त्या कानाला खबर कळू देऊ नका.’’ असा सल्ला दिला. यानंतर नारायणराव घरी गेले व एक पिशवी घेऊन आले. नारायणरावांना पाहताच दुकानदार लगबगीने पुढे आले. दुकानाचे शटर बंद करून घेतले. ‘‘सावकाश या. तुम्हाला कोणी पाहिले नाही ना?’’ असे काळजीने विचारले.
नारायणरावांनी मान नकारार्थी डोलावली.
‘‘ब्लॅक मनी कोठंय?’’ दुकानदाराने हळूच विचारले. त्यावर नारायणरावांनी पिशवी खाली ओतली. त्यामध्ये चार व आठ आण्यांची काळी पडलेली भरपूर नाणी होती. ‘‘पाचशे रुपये आहेत. तुमचे कमिशन पंधरा टक्के कमी करून, राहिलेले पैसे मला परत करा.’’ नारायणरावांनी असं म्हटल्यावर दुकानदाराचा चेहरा त्या नाण्यांपेक्षाही काळाठिक्कर पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com