हाफतिकिटाचा सांगावा

हाफतिकिटाचा सांगावा

हाफ तिकिटाचा सांगावा
---------------------------
‘‘प्रिय नवरोबा, एसटी बसच्या ‘हाफ’ तिकिटावरून आम्हाला टोमणे मारायचे संपले असतील, अशी अपेक्षा करते. पूर्वी टोमणे मारण्यात आमची मक्तेदारी होती. मात्र, अलीकडच्या काळात टोमणे मारायच्या क्षेत्रातही तुम्हा पुरुषांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते. समाज माध्यमावरील विनोदाकडे नुसते पाहिले तरी त्याची प्रचिती येते.
अनेक रिल्समध्येही एसटीत बसलेला नवरा ‘एक फूल आणि (बायकोकडे पाहत) `एक हाफ’ द्या, असे म्हणतो, असे जोक्स करून बळंबळं हसण्याचे प्रात्यक्षिकही झाले असतील, तर आता माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. आतापर्यंत मी बोलायचे आणि नेहमीप्रमाणे तुम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे, असा सोईस्कर नियम तुम्ही केला होतात. इथूनपुढे तसं चालणार नाही.
फक्त आठ मार्चला महिलादिनी आमच्यावर स्तुतीसुमने उधळून, आम्हाला घरकाम व इतर कामातून एक दिवसांसाठी सुटी देता आणि वर्षभर राब- राबवून घेता. खरं तर आता आपण उलटं केलं पाहिजे म्हणजे महिला दिनी मी दिवसभर काम करीन व वर्षभर तुमच्यासारखे आरामात दिवस काढेल. खरंच किती छान होईल ना. मी आपली रोज पहाटे उठून सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. तुमचा डबा तुमच्या हातात देऊन, माझा डबा घेऊन, भिंगरीगत पळायचं. आॅफिसमध्येही मरमर मरायचं आणि सायंकाळी सहाचे ठोके पडताच घरी मुलं आणि सासूबाई वाट पाहत असतील म्हणून धावत- पळत घरी यायचं. तुमच्या सगळ्यांना हवं नको ते बघायचं. तुम्ही आणि मी एकाचवेळी घराबाहेर पडतो. तरीही येताना तुम्ही मस्त डुलत डुलत घरी येता. हात- पाय धुऊन ‘खूप दमलोय’ असे म्हणून बेडरूममध्ये लोळत पडता. परत रात्री हात- पाय आणि डोकं दाबून देण्याची अपेक्षा करता. मी मात्र, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फक्त काम आणि कामच करत असते. असं घड्याळाच्या काट्यावर जगायचा मलाही खूप कंटाळा येतो. आठवड्यातून एक रविवारी सुटीचा येतो. त्यादिवशी तुम्ही मित्रांना घरी बोलावता किंवा सासूबाई नातेवाइकांना बोलावतात. मग तुमच्या माय- लेकांच्या आॅर्डरी पुरवता- पुरवता माझी पुरती दमछाक होते.
खरं तर महाराष्ट्र सरकारने महिलांना हाफ तिकीट लागू केलं आहे, याचा मला फार आनंद झाला आहे. तुम्ही फक्त याकडे ‘हाफतिकीट’ म्हणून बघू नका. ‘सरकार आमच्यासाठी विविध सोयी- सवलती देतंय. स्वतःच्या घरातही आम्हाला सोयी- सवलती कधी मिळणार आहेत? तिकिटाचा निम्मा वाटा सरकार उचलणार आहे. आमच्या कामाचा निम्मा वाटा तुम्ही कधी उचलणार आहात? अनेक महिला कामाच्या नावाखाली स्वतःला घरात कोंडून घेतात. त्यांनी बाहेरचं जग पहावं, मस्तपैकी फिरावं, स्वच्छंदी जगावं, फुलपाखरासारखा जीवनाचा आनंद लुटावा, असा या हाफ तिकिटाचा सांगावा आहे.
या हाफतिकिटामुळे आपण दोघांमध्ये कामाची नव्याने विभागणी करू. ‘घरी काय असतं काम?’ असं तुम्ही येता- जाता मला टोमणे मारता. आता
उद्यापासून तुम्ही दररोजच्या स्वयंपाकाचे बघत जा. मुलांचा नाश्‍ता, त्यांचे आवरणे, त्यांचा डबा, नंतर स्वयंपाक ही कामे तुम्ही करा. तुमच्यादृष्टीने किरकोळ असणारी घरातील कामेही करा. आॅफिसमधून तुम्ही आल्यानंतर पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारीही घ्या. मी मात्र परगावी होणारी लग्ने- कार्ये, नातेवाइकांच्या भेटीला जाणे, तुम्ही सतत काही कामानिमित्त आपल्या मूळगावी तसेच परगावी जाता, ते कामही इथूनपुढे मी करीन. एसटीचे तिकीट महिलांसाठी हाफ झाल्याने ही कामे मी आनंदाने करीन. त्यामुळे आपला पैसाही वाचेल आणि तुम्हाला घरातल्या जबाबदाऱ्या काय आहेत, हेही कळेल. एक एक रूपया वाचवून आम्ही बायका संसार करत असतो. हाफतिकीटामुळे या बचतीला सरकारने प्रोत्साहन दिले आहे. हाफतिकिटाचा हा सांगावा तुम्ही ध्यानात घ्यावा, ही कळकळीची विनंती.
कळावे, आपली प्राजक्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com