
केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी, ता. २६ : खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा दिवस भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून गणला जाईल. केंद्र सरकारने ताबडतोब राहुल गांधी यांच्या खासदारकीविषयी घेतलेला निर्णय रद्द करावा. अन्यथा काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरून, जाब विचारेल, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी येथे शनिवारी (ता. २५) दिला.
पिंपरीत कदम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनीही केंद्र सरकारचा निषेध केला. ज्येष्ठ नेते गौतम अरकडे, अभिमन्यू दहितुले, सायली नढे, विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, नरेंद्र बनसोडे, कौस्तुभ नवले, विजय ओव्हाळ आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.’’
फोटोः 32845