प्रतीक्षा सक्षम बीआरटीची -- डांगे चौकात आठवडे बाजाराचा ‘खोडा’ सांगवी फाटा-किवळे मार्गात भरतो बाजार; काळेवाडा फाटा चौकातही धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतीक्षा सक्षम बीआरटीची 
--
डांगे चौकात आठवडे बाजाराचा ‘खोडा’

सांगवी फाटा-किवळे मार्गात भरतो बाजार; काळेवाडा फाटा चौकातही धोका
प्रतीक्षा सक्षम बीआरटीची -- डांगे चौकात आठवडे बाजाराचा ‘खोडा’ सांगवी फाटा-किवळे मार्गात भरतो बाजार; काळेवाडा फाटा चौकातही धोका

प्रतीक्षा सक्षम बीआरटीची -- डांगे चौकात आठवडे बाजाराचा ‘खोडा’ सांगवी फाटा-किवळे मार्गात भरतो बाजार; काळेवाडा फाटा चौकातही धोका

sakal_logo
By

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ ः शहरातील सर्वात पहिला व अधिक लांबीचा सांगवी फाटा ते किवळेतील मुकाई चौक बीआरटी मार्ग आहे. या १४.५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर पाच सप्टेंबर २०१५ रोजी पहिली बस धावली. हा मार्ग, बसथांबे, प्रवाशांसाठीचे रॅम्प सुस्थितीत आहेत. बससंख्याही पुरेशी आहे. पण, तीन चौकातील उड्डाणपुलांच्या खांबांमुळे डाव्या व उजव्या बाजूने येणारी छोटी वाहने दिसत नसल्याने बसचालकांची कसोटी लागते. शिवाय, डांगे चौकापासून डेअरी फार्मपर्यंत बीआरटी मार्गातच रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे बसला डावीकडे वळण घेऊन, सेवा रस्त्याने जावे लागते. तिथेही काही दुकाने असतात. त्यामुळे ‘बीआरटी’ला खोडा निर्माण होतो.
सांगवी फाटा अर्थात मुळा नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापासून बीआरटी मार्ग सुरू होतो. त्यावरील जगताप डेअरी चौक (साई चौक), काळेवाडी फाटा आणि थेरगावच्या डांगे चौकात दुहेरी उड्डाणपुल आहेत. दोन्ही पुलांच्यामधून बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे विनाअडथळा बस जातात. मात्र, चौकातील खांबांमुळे डाव्या किंवा उजव्या बाजूने येणारी छोटी वाहने चालकांना दिसत नाहीत. त्यांना दिशा दाखवण्यासाठी सुरक्षारक्षक वा वॉर्डनही नसतात. रावेत येथील भोंडवे कॉर्नरपासून मुकाई चौकापर्यंतही विनाअडथळा जाता येते. पण, काही खाजगी वाहने या मार्गातून धावत असल्याचेही दिसले.

डांगे चौकातील पर्याय...
सांगवीकडून किवळेकडे जाणाऱ्या बस रविवारी डांगे चौकातून डावीकडे वळून सेवा रस्त्याने पुढे जातात. पूल संपल्यानंतर डेअरी फार्म थांब्याजवळून पुन्हा बीआरटी मार्गात प्रवेश करतात. तसेच, किवळेकडून सांगवी-औंधकडे येणाऱ्या बस डेअरी फार्म येथून डावीकडे सेवा रस्त्याला वळून डांगे चौकात पुन्हा उजवीकडे वळून बीआरटी मार्गात येतात.

वाहनचालक म्हणतात...
सांगवी-किवळे मार्ग चांगला आहे. पण, रविवारी आठवडे बाजार असल्याने डांगे चौकात गर्दी असते. सर्विस रोडवरही दुकाने असतात. त्यातून बस चालवावी लागते.

दुकानदार म्हणतात...
अनेक वर्षांपासून इथे आठवडे बाजार भरतो. आम्हाला पर्यायी जागा नसल्याने आम्हीही इथेच दुकाने लावतो. रविवारी सर्व बस बाहेरून जातात.

काय करायला हवे
- डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारसाठी स्वतंत्र जागा द्यायला हवी
- साई चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, वाकड रोड, भोंडवे कॉर्नर येथे वॉर्डनची गरज
- सर्वच बसथांब्यांवर सुरक्षारक्षक नियुक्त करायला हवेत
- मार्गातील बस थांब्यांच्या छतांवरील जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे काढावेत

बीआरटी बसचे दरवाजे व बसथांबा यांच्यात मोठी जागा असते. दरवाजे स्वयंचलित आहेत. चालकांकडून अनेकदा प्रवासी बसमध्ये बसण्यापूर्वीच दरवाजे बंद केले जातात. अशा वेळी बसमध्ये चढ-उतार करताना अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीचा पाय दरवाजात अडकून दुखापत झाली होती.
- श्रृती मोहरकर, विद्यार्थिनी

माझे कॉलेज ताथवडेला कात्रज-देहूरोड बायपासवर आहे. औंध किंवा चिंचवडकडून थेट बससुविधा नाही. डांगे चौक किंवा भूमकर चौकात उतरावे लागते. तेथून कॉलेज खूप लांब आहे. सांगवी-किवळे बीआरटी मार्गाने गेल्यास ताथवडे स्टॉपला उतरून चालत जावे लागते. हे अंतरही अधिक असल्याने कॉलेजपर्यंत बस हवी.
- विक्रम खाडे, विद्यार्थी

फोटोः 32872