दलित साहित्यातून समता, बंधूतेची प्रेरणा

दलित साहित्यातून समता, बंधूतेची प्रेरणा

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २७ ः ‘‘दलित साहित्य हे संवेदनशील समाजमनाला अस्वस्थ करणारे आहे. ते आनंद देणारे नसून, अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करणारे आहे. गुलामी झुगारून समता आणि बंधुता असलेल्या स्वातंत्र्यासाठी चळवळ पुढे नेणाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे,’’ असे प्रतिपादन ‘सनातन’कार डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी येथे केले.
के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे सरस्वती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित ‘सनातन’ या कादंबरीच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उत्साहात करण्यात आले. माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, हिंदी साहित्यिक समीक्षक दामोदर खडसे, विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, प्रा. लक्ष्मण गायकवाड, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि राजीव बर्वे आदी उपस्थित होते. चर्चासत्राचे उद्‍घाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. विद्यासागर म्हणाले, ‘‘सनातन’ कादंबरी सनातन हिंदू धर्माकडे एक बोट दाखवत असली तरी चार बोटे आपल्याकडे असल्याचे निर्देशित करणारी तसेच अंतर्मुख करणारी साहित्यकृती आहे. धर्माच्या नावावर एकवटलेले भेदभावरंजित स्तर मोडीत काढून सर्व समाजांनी एकत्र येण्याचा भाव निर्माण करण्यासाठी ही कादंबरी विचार करायला लावते.’’
गायकवाड म्हणाले, ‘‘उपेक्षितांना न्याय देणारे वैश्विक साहित्य निर्माण करणाऱ्या डॉ. लिंबाळे यांनी स्थिर पावलेल्या मराठी भाषेला प्रवाहित केले आहे.’’ प्रा. दामोदर खडसे, माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे यांनी मनोगत केले. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची मुलाखत घेतली. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सत्यजित खांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

३२८९६
तळेगाव दाभाडे ः ‘सनातन’कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार करताना डॉ. विद्यासागर आणि चंद्रकांत शेटे. (डावीकडून) प्राचार्य डॉ. मलघे, प्रा. लक्ष्मण गायकवाड आणि राजीव बर्वे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com