वाहनातील गाण्यांचा 
दणदणाट येणार अंगलट 
शहर पोलिसांकडून कारवाई सुरु

वाहनातील गाण्यांचा दणदणाट येणार अंगलट शहर पोलिसांकडून कारवाई सुरु

पिंपरी, ता. २६ : वाहनातील साउंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावून, सुसाट सुटणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा दणका सुरु केला आहे. यामुळे वाहनातील आवाजाचा दणदणाट चालकांच्या अंगलट येणार आहे.
वाहनात मोठे साउंड बसवून, त्यावर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या चालकांचे प्रमाण अधिक आहे. गाणी लावून भरधाव वाहन चालविल्याने अपघाताच्या घटनांसह वादाचे व महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही घडत आहेत. ध्वनी प्रदूषणही होत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत हुल्लडबाजी केली जाते. यातून वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत.
यामुळे अशा बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध वाहतूक विभागात मोहीम सुरु झाली असून, मागील तीन दिवसात ३७ जणांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------
वादाचे प्रसंग
सिग्नलवर, चौकात, रस्त्यावर अथवा रिक्षास्टॅंड, बसथांबा, सिनेमागृह, मॉल, शाळा, कॉलेज परिसरातही मोठ्या आवाजात गाणी लावलेली वाहने नजरेस पडतात. काही ठिकाणी तर रस्त्यातच वाहन उभे करून हुल्लडबाजी केली जाते. वाढदिवसही साजरे केले जातात. यामधून वाद होऊन हाणामारीचेही प्रकार घडतात.
------------------------------
अपघाताचा धोका
मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालविण्यास बाजूने जाणाऱ्या इतर वाहनांचा अंदाज येत नाही. हॉर्नही ऐकायला येत नाही. इतर वाहन चालकांनाही त्रास होत असून, यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.
-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com