गुन्हे शाखा

गुन्हे शाखा

संगणक ‘हॅक’ करून धमकी
वाकड : संगणक हॅक करून अज्ञात इसमाने धमकीचा मेसेज पाठवला. ‘आम्हाला सहकार्य केले नाही तर तुमचा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही’, असे मेसेजमध्ये नमूद आहे. हा प्रकार २८ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास वाकड येथील प्रणव एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये घडला. जितेंद्र दिलीप चौधरी (वय ४०, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या ऑफिसमधील संगणक ‘हॅक’ केला. दोन मेल आयडी देऊन जबरदस्तीने संपर्क करण्याबाबत एका फोल्डरमध्ये एक मेसेज सेव्ह केला. ‘जर संपर्क केला नाही तर तुमचा डाटा तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जर माझ्यावर खात्री नसेल तर एक फाइल आम्ही ओपन करून देऊ. ती आमची गॅरंटी आहे. तुम्ही जर आम्हास सहकार्य नाही केले तर तुमचा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही’, असे मेसेजमध्ये नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

पूर्ववैमनस्यातून गोळ्या घालण्याची धमकी
चाकण : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाने बंदूक रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (ता. १) दुपारी चाकण येथील शिक्रापूर रोडवरील बस स्टॉपवर घडला. या प्रकरणी हनुमंत राजाराम वाडेकर (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. अशोक ऊर्फ बबु गोविंद वाडेकर (रा.बहुळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा भाऊ बाजीराव वाडेकर, वेदांत माने आणि एक महिला बस स्टॉपवर उभे होते. आरोपीने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून वेदांत याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. फिर्यादी व त्यांचे आई-वडील तेथे गेले असता आरोपीने घरातून बंदूक आणली. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

घरातून पाच मोबाईल चोरीला
तळेगाव दाभाडे : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी पाच मोबाईल चोरून नेले आहेत. ही घटना २३ ते २४ मे रोजी बधलवाडी, मावळ येथे घडली. या प्रकरणी शाहजात मुसैयद अन्सारी (वय ३८, रा.बधालेवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उकडत असल्याने फिर्यादी राहत्या खोलीचे दार उघडे ठेवून झोपले होते. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

बालविवाह प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणाऱ्या तरुणासह चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना पिंपरीगाव येथे उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही आरोपींनी तिचा विवाह २२ वर्षीय तरुणासोबत लावून दिला. त्यानंतर तरुणाने फिर्यादी यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

मोटारीमधून रोख रक्कम पळवली
चिंचवड : मोटारीमध्ये ठेवलेली पन्नास हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली. अंकित अर्जुन प्रसाद (वय ३२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
चिखली : संमतीशिवाय मालमत्ता गहाण ठेवून पाच जणांनी मिळून ७६ कोटी ४५ लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार चिखली गाव येथे घडला. या प्रकरणी शांतीलालजी मोहनलाल कवर (वय ६५, रा. मुंबई) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ईश्वर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व ट्रेड सेंटर अँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तसेच ईश्वर चंदुलाल परमार, आनंद नवरत्न जैन, नरेन किसन मकवाना आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचे भागीदार यांच्या मालकीची चिखली गाव येथे १४ हेक्टर ४० गुंठे जमीन आहे. दरम्यान, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांची ही मालमत्ता गहाण ठेवून फायनान्स कंपनीकडून ७६ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने फसवणूक
पिंपळे सौदागर : ऑनलाइन जॉबमधून अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखवून ऑनलाइन टास्कच्या देत एकाची १५ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ४ ते ८ मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला. दीप सुरेश पांडे (वय ३०, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित सिंग, जॉन डॅनियल, जास्मीन आदर्श आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करून टेलिग्रामवर वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांची १५ लाख ९६ हजार ४८५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

भाटनगरमधून दोन किलो गांजा जप्त
पिंपरी : भाटनगर, पिंपरी येथून दोन किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. बुधवारी (ता. ३१) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महावीर गायकवाड (वय ४०, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार आतिश कुडके यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महावीर याच्या ताब्यात गांजा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करीत महावीर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचा दोन किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

बनावट हॉलमार्क असलेले दागिन्यांची विक्री
चाकण : बनावट हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करून एका सराफाची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांबोली येथील अवंती ज्वेलर्स या दुकानात घडली.
ज्ञानेश्वर भाऊ लोंढे (वय ४६, रा. पाईट, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित बंडू गदळे (वय १८, रा. केसनंद, पुणे), नितीन बालाजी काळे (वय २४, रा. केसनंद, पुणे. मूळ रा. उस्मानाबाद) आणि इतर काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींचे ज्वेलर्सचे दुकान आहे. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन सोन्याची पॉलिश केलेले बनावट हॉलमार्कचे दागिने दिले. बनावट पावती दाखवून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. दरम्यान, दागिने पॉलिश केलेले असून ते बनावट असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अभिजित आणि नितीन या दोघांना अटक केली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com