
तळेगावात पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ८ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेगाव येथील ग्रुप सेंटर, सी.आर.पी.एफ., तळेगाव पुणे येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारतर्फे मिशन लाइफ अंतर्गत १९ मे ते ०५ जून या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये सायकल रॅली, युवा संमेलनांतर्गत वादविवाद स्पर्धा, पर्यावरण विषयावर नृत्य व चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे पी. एस. रणपिसे महानिरीक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल, पश्चिम विभाग नवी मुंबई,
दर्शनलाल गोला उपमहानिरीक्षक, पुणे विभाग केंद्रीय राखीव पोलिस दल, राकेश कुमार उपमहानिरीक्षक, पुणे विभाग केंद्रीय राखीव पोलिस दल, डॉ. डी. आर. हेगडे उपमहानिरीक्षक (वैद्यकीय) संयुक्त रुग्णालय केंद्रीय राखीव पोलिस दल पुणे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी रणपिसे म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यानंतर पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग आणि अन्नटंचाईसारख्या मोठ्या समस्यांचा धोका वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी, वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होत आहेत. जंगलतोड, विजेचा अतिवापर, कारखान्यांमधून निघणारा धूर, कचरा गोळा करणे, औद्योगिकीकरण आदींमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. या वेळी सर्व अधिकारी व जवानांनी या पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपापल्या स्तरावर शक्य तितके प्रयत्न करतील आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करताना या पृथ्वीवर निरोगी जीवनाच्या शक्यतांना चालना देतील अशी शपथ घेतली.
PNE23T47566