मिळकतकर भरण्यासाठी
‘ऑनलाइन’ला पसंती

मिळकतकर भरण्यासाठी ‘ऑनलाइन’ला पसंती

मिळकतकर भरण्यासाठी
‘ऑनलाइन’ला पसंती

एका क्लिकवर करभरणा ः आतापर्यंत ७५ टक्के मिळकतधाराकांचा प्रतिसाद

पिंपरी, ता. ६ ः महापालिकेचा मिळकतकर भरणा करण्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागत होते. तासन् तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे. नागरिकांना घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत एका क्लिकवर कराचा भरणा करता येत आहे. या ऑनलाइन सुविधेसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन महिन्यात करभरणा केलेल्या एक लाख ६२ हजारांपैकी एक लाख २२ हजार ९३१ मिळकतधारकांनी ऑनलाइन करभरणा केला आहे. हे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळी जमीन अशा शहरातील सहा लाख दोन हजार २०३ मिळकतींची महापालिकेकडे नोंदणी आहे. त्यापैकी एक लाख ६२ हजार मिळकतधारकांनी २०४ कोटी ६६ हजार रुपयांचा करभरणा केला आहे. महापालिकेने प्रथमच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सिद्धी प्रकल्पाअंतर्गत घरपोच बिले वाटप केली आहेत. त्याअंतर्गत मिळकतधारकांचे पत्ते, संपर्क क्रमांक अपडेट केले आहेत. त्यामुळे मोबाईलवरसुद्धा मिळकतकराची बिले उपलब्ध झाली आहेत. शिवाय, ३० जूनपर्यंत ऑनलाइन करभरणा केल्यास सामान्य करात पाच टक्के सवलत महापालिकेने जाहीर केली आहे. त्याचा लाभही घेतला जात आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना ऑनलाइन करभरण्यास अडचणीचे ठरते, त्यांच्यासाठी ॲप, धनादेश, इडीसी, आरटीजीएस व रोखीने करभरण्याची सुविधा आहे. आतापर्यंत सर्वाधिक २४ हजार ३९६ मिळकतधारकांकडून वाकड विभागीय कार्यालयात करभरणा झाला आहे. तर, सर्वात कमी एक हजार ६२२ मिळकतकर पिंपरी नगर कार्यालयात झाला आहे. शहरातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही विभागीय करसंकलन कार्यालयात कराचा भरणा करता येत आहे.

स्वतंत्र हेल्पलाइन
कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास व मिळकतधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर २४ बाय ७ सेवा सुरू आहे. काही अडचण आल्यास नागरिकांनी संबंधित हेल्पलाइनवर संपर्क शोधून शंकांचे निरसन केले जाणार आहे.

असा झाला करभरणा
पद्धत / मिळकतधारक / रक्कम (कोटीत)
ऑनलाइन / १,२२,९३१ / १५१,९६,२८,०००
विविध ॲप / २,७४६ / २,४२,८७,०००
रोख / २७,६८३ / २५,८५,८३,०००
धनादेश / ५,६६९ / १६,२३,००,०००
इडीसी / ... / २,३९,००,०००
आरटीजीएस / ... / ३,४२,००,०००

मिळकतीनिहाय करभरणा
वर्णन / मिळकती
निवासी / १,४६,०९१
बिगर निवासी / ११,६७५
मिश्र / २,७८९
औद्योगिक / १,०४५
मोकळ्या जागा / ९७४
एकूण / १,६१,३५९

मी नेहमीच मिळकतकर ऑनलाइन भरतो. अवघ्या पाच मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. केवळ नंबर टाकला की, कराची एकूण रक्कम स्क्रीनवर दिसते. त्यात सवलतीची व भरायची रक्कमही दिसते. ३० जूनपर्यंत ऑनलाइन करभरल्याच पाच टक्के सवलत मिळत आहे.
- प्रशांत पाटील, वाकड

करसंकलन कार्यालयात जाऊन करभरणा करणे त्रासदायक ठरते. सर्व कामे सोडून रांगेत उभे राहावे लागते. किंवा घरातील कोणालाही तरी सांगून भरणा करावा लागतो. प्रत्येक वेळी तेव्हा वेळ नसतो. त्यापेक्षा ऑनलाइन सुविधा चांगली आहे. पण, उपयोगकर्ता शुल्क आकारू नये.
- चारुहास कुलकर्णी, पिंपळे सौदागर

ऑनलाइन सुविधेमुळे घरबसल्या करभरता येत आहे. सुविधा चांगली आहे. अवघ्या काही मिनिटांत घरी बसून सेवा मिळत आहे. मात्र, मोशी-चिखली भागात मूलभूत सुविधा पुरविल्यास कराचा भरणा करणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल. उपयोगकर्ता शुल्कामुळे नागरिक नाराज आहेत.
- संदीप बोरसे, मोशी

मिळकतकर थकबाकीदारांवर जप्तीची निरंतर कारवाई सुरू आहे. त्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण अशी त्रिसूत्री करसंकलन व आकारणी विभागाला दिली आहे. करवसुली यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्यावर भर आहे.
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com