
राज्यकर्त्यांनी शिवरायांचा आदर्श बाळगावा ः रानवडे
पिंपरी, ता. ७ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलाविषयक धोरणांचा राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी आज केले. राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांशी अतिप्रसंग करणाऱ्यांचे हात- पाय तोडले. मात्र, जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करणा-या भारतीय महिला क्रीडापटूंना मात्र आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे. याकडे भारत सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे व महिला क्रीडापटूंना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा सेवा संघाच्यावतीने एच. ए. कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जिजाऊ संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता शिंदे व उपाध्यक्षा माणिक शिंदे, सचिव शीतल घरत, कायदा कक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम डफळ, ॲड. सुनील रानवडे आदी उपस्थित होते.