
खासगी रुग्णालये नोंदणी, नुतनीकरण ऑनलाइन
पिंपरी, ता. ६ ः शहरातील सर्व खासगी दवाखाने व रुग्णालयांची नोंदणी, नूतनीकरण, नोंदणीत बदल करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा मंगळवारपासून उपलब्ध करून दिली. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. नोंदणी करताना संबंधित रुग्णालयाने अधिकृत व्यक्तीच्या नावाने ऑनलाइन खाते तयार करून अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. त्यासोबत सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत.
शहरातील सर्व प्रमुख भाग महापालिकेच्या आठ प्रमुख रुग्णालयांच्या अंतर्गत समाविष्ट केले आहेत. खासगी रुग्णालयांची नोंदणी त्यांच्या ठिकाणानुसार महापालिका रुग्णालयांच्या अंतर्गत असेल. अर्धवट, अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही. प्रमाणपत्राची सत्यता पडताळणीबाबत ‘क्यूआर कोड’ सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रियेमधील सर्व टप्प्यांची माहिती एसएमएसद्वारे संबंधित रुग्णालयांना कळविली जाईल. महापालिकेचा वैद्यकीय विभाग मॅन्युअल नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे बंद करत आहे. या पुढील सर्व अर्ज फक्त ऑनलाइन सिस्टीमद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. संबंधित रुग्णालय व महापालिका वैद्यकीय विभाग यांना नोंदणी प्रक्रियेमधील एखाद्या रुग्णालयाचा अर्ज कुठे येऊन थांबला आहे किंवा त्याची सद्यःस्थिती काय आहे? हे डॅशबोर्ड वरून पाहता येईल, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली. शहरातील दवाखाने व रुग्णालयांच्या नोंदणीसाठीच्या ऑनलाइन सेवचा प्रारंभ प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाला.
रुग्णालय नोंदणी प्रक्रिया
- नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिका वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णालयाला भेट देऊन निरीक्षणे, अभिप्राय ऑनलाइन नोंदवतील
- स्थळ पहाणीनंतर संबंधित रुग्णालय नोंदणी प्रक्रिया, शुल्क भरणा व अंतिम टप्प्यासाठी मुख्य कार्यालयाकडे वर्ग केले जाईल
- मुख्य कार्यालयातील वैद्यकीय विभाग रुग्णालयांच्या उपलब्ध सेवा-सुविधांनुसार अंतिम दर नोंद करून रुग्णालयांना मागणी चलन उपलब्ध करून देतील
- रुग्णालयाने नोंदणी प्रक्रियेचे शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लॉगिनद्वारे अंतिम प्रमाणपत्र उपलब्ध होईल