Sant Tukaram Maharaj : देहूत पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची ‘लगीनघाई’ dehu sant tukaram maharaj palkhi sohala development work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dehu sant tukaram mandir
देहूत विकासकामांची ‘लगीनघाई’

Sant Tukaram Maharaj : देहूत पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची ‘लगीनघाई’

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतात. त्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू नगर पंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग परिसरातील अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाले आहेत. इंद्रायणीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नगर पंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. देहूतील विविध ठिकाणी एक हजार फिरती स्वच्छतागृह बुधवारी ठेवण्यात आली.

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दहा जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारकऱ्यांना सोयी मिळाव्यात, यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाची लगबग सुरू आहे. वारीसाठी आलेल्या भाविकांना यंदा नगरपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य किट्सचे वाटप करण्यात येणार आहे.

देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम म्हणाले, ‘गावातील रस्त्यांचे मुरुम टाकून साइडपट्टे भरल्याने रुंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. पालखी सोहळ्यापूर्वी गावातील रस्ते चकाचक व्हावेत यासाठी नगरपंचायत प्रशासनही जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी ४० कर्मचारी तैनात केले आहेत. सध्या इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

गावातील अंतर्गत रस्ते, गटारे यांची साफसफाई सुरू आहे. दहा जूनला प्रस्थान असल्याने दोन दिवस अगोदर दिंड्या, भाविक दाखल होतात. त्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गावातील विहीर, हातपंपाची दुरुस्ती सुरू आहे. पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली आहे.

गावात विकास आराखड्यातंर्गत २६० स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. विनामोबदला भाविकांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे. निर्मलवारीसाठी एक हजार फिरती स्वच्छतागृह विविध दहा ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत.

गावातील विजेच्या खांबावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. दोन दिवसांत गावात औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएल पावडरचा साठा उपलब्ध केला आहे. धूर फवारणीसाठी चार मशिन उपलब्ध आहेत. माळवाडी, विठ्ठलवाडी या गावातही भाविक मुक्कामी असतात. तेथेही स्वच्छतेची कामे करण्यात आली आहे. पालखी मार्गावर खड्डे बुजविण्यात आले आहेत. साइडपट्टे भरण्यासाठी मुरुम टाकण्यात आला आहे.

‘पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामे करण्यात आलेली आहेत. वारीत स्वच्छता, भाविकांना पिण्याचे पाणी आणि आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात याकडे जास्त लक्ष देणार आहे.’

- स्मिता चव्हाणस नगराध्यक्षा, देहू

उपाययोजना...

- इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात येणार असून, इंद्रायणी नदी परिसरात जीवरक्षक व एनडीआरएफचे पथक सुरक्षेसाठी तैनात

- सरकारकडून सहा आणि नगरपंचायतीकडून दहा असे सोळा पिण्याचे पाण्याचे टॅंकर विविध ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत

- चोविस तास नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार

- महावितरणाला २४ तास वीजपुरवठा अखंडपणे सुरू ठेवण्याच्या सूचना

- उपहारगृहे, खानावळ या ठिकाणी आवश्यक सूचना देऊन कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणार.

- पिण्याच्या पाण्याचे आरो प्लॅन्टची तपासणी. त्यातील चार प्लॅन्ट बंद

- अग्निशमन दलाची तीन वाहने पालखी सोहळा प्रस्थानला असणार

- भाविकांच्या सुरक्षेसाठी ५४ विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

‘निधी लवकर मिळावा’

देहू नगर पंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यासाठी सरकारकडे नगरपंचायत प्रशासनाने दीड कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, सरकारने अद्याप निधी दिलेला नाही. त्यामुळे निधी लवकर मिळावा, अशी मागणी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केली आहे.