संताजी महाराज जगनाडे पालखीचे
शनिवारी सुदुंबरे येथून प्रस्थान

संताजी महाराज जगनाडे पालखीचे शनिवारी सुदुंबरे येथून प्रस्थान

संताजी महाराज जगनाडे पालखीचे
शनिवारी सुदुंबरे येथून प्रस्थान

पिंपरी, ता. ७ ः आषाढी वारीनिमित्त श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी चार वाजता सुदुंबरे (ता. मावळ) येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात राज्यातील सात दिंड्या व सुमारे तीन हजार वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर यांनी दिली.
संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा अभंगांचे पुनर्लेखन केले आहे. त्यांच्या १४ टाळकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे यंदा ४१ वे वर्ष आहे. त्यांच्या सुदुंबरे येथील समाधी मंदिरामधून पालखी प्रस्थान होईल. त्याच दिवशी पालखी गावातीलच विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मुक्कामी राहील. रविवारी (ता. ११) सकाळी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. त्यात पुणे, नगर, बीज, नाशिक, सातारा, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील सात दिंड्या सहभागी होतील. रविवारी (ता. ११) पालखीचा मुक्काम चिंचवड येथे राहील. पालखी रथापुढे कोथरूड (पुणे) येथील विनोद लोखंडे यांचा अश्व असेल. पालखी रथाला यवत येथील प्रगतीशील शेतकरी छबनमहाराज कुदळे यांची सर्जा-राजा खिलारी बैलजोडी असेल. सोमवार (ता. १२) व मंगळवारी (ता. १३) पुण्यातील भवानी पेठेत पालखीचा मुक्काम असेल. बुधवारी (ता. १४) सकाळी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामागोमाग दिवे घाट मार्गे सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा २७ जून रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तेथील श्री संताजी महाराज जगनाडे मठात (कुंभार गल्ली, प्रजापती ब्रह्मकुमारी मठामागे, कैकाडी महाराज मठाजवळ) पालखीचा मुक्काम असेल. तीन जुलै रोजी पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. दरम्यान, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथे नियोजित श्री संताजी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन शांतीब्रह्म मारुतीबाबा कुऱ्हेकर यांच्या हस्ते होईल.
- अरविंद रत्नपारखी, सचिव, श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ, सुदुंबरे
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com