ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे आधार व्हा!
आमदार चव्हाण यांचे आवाहन; खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे पुरस्कार वितरण

ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे आधार व्हा! आमदार चव्हाण यांचे आवाहन; खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे पुरस्कार वितरण

पिंपरी, ता. २६ ः ‘‘प्रत्येकाला वाटतं शिकून मोठं व्हावं. नोकरी करावी, स्वत:चा उद्योग उभारावा. पण ग्रामीण भागात पुरेशा सोयीसुविधा नसल्याने अनेकांची स्वप्नं धुळीस मिळतात. त्यामुळे कामधंदा व नोकरीच्या शोधात अनेक जण शहरात येतात. तसे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये येतात. अशांना सुरवातीला कुठलाच आधार मिळत नाही. नैराश्य येते. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने स्वत: पुढाकार घेऊन मदत करायला हवी, असे आवाहन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
खान्देश मराठा पाटील समाज संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण झाले. त्यात चव्हाण यांना ‘समाजभूषण’, हलाखीच्या परिस्थितीत मुलांना आयएएस अधिकारी घडविलेले प्रभाकर ऊर्फ अण्णा पाटील व इंदूबाई पाटील यांना ‘जीवन गौरव’ आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३ जणांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यावेळी ते बोलत होते.
आकुर्डीत झालेल्या कार्यक्रमास पुणे महापालिका उपायुक्त प्रतिभा पाटील, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, उद्योजक दीपक पाटील, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मंडळाचे कार्याध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सहकार्याध्यक्ष पंकज निकम, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाट, देविदास पाटील आदी उपस्थित होते. विनोद कुमावत, राणी कुमावत, विलास सिरसाठ यांचा अहिराणी गीत-नृत्याचा कार्यक्रम झाला. लकी ड्रॉ कूपन काढून विजेत्या महिलांचा पैठणी देवून सत्कार केला.
उपायुक्त पाटील म्हणाल्या, ‘‘मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. आमच्या आई-वडिलांनी आम्ही अधिकारी व्हावे, देशसेवेची मूठ बांधावी, यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे भाऊ राजेश पाटील आयएएस आणि मी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. फक्त शिक्षण आणि मुलांचे लग्न या पलिकडे पालकांनी पाहायला हवे. मुलींच्या शिक्षणासह त्यांची जमेची बाजू ओळखायला हवी.’’ भरत बारी यांनी सूत्रसंचालन केले.

विविध पुरस्कारांचे मानकरी
राहुल देसाई (उत्कृष्ट कार्य), डॉ. शीतलकुमार रवंदळे (शिक्षणरत्न), ॲड. भूषण पाटील (सामाजिक न्याय), प्रशांत पाटील (शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील), हिरामण भामरे (अर्थभूषण), हेमंत पाटील (उद्योजक), मनोज पाटील (उद्योगरत्न), भारती बोरसे (सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका), गुलाब पाटील (उद्योगरत्न), देविदास पाटील (सामाजिक), मनोज पाटील (युवा उद्योजक), जितेंद्र पाटील (उद्योगरत्न), रोहिणी पाटील (क्रीडा) यांचा समावेश होता.
--
फोटोः 32974

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com