गृहनिर्माण सोसायट्यांमधून मदतीचा हात जुन्या वस्तूंची दुरूस्ती ः अनाथाश्रम व वृद्धाश्रमापर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहनिर्माण सोसायट्यांमधून मदतीचा हात
जुन्या वस्तूंची दुरूस्ती ः अनाथाश्रम व वृद्धाश्रमापर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार
गृहनिर्माण सोसायट्यांमधून मदतीचा हात जुन्या वस्तूंची दुरूस्ती ः अनाथाश्रम व वृद्धाश्रमापर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार

गृहनिर्माण सोसायट्यांमधून मदतीचा हात जुन्या वस्तूंची दुरूस्ती ः अनाथाश्रम व वृद्धाश्रमापर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : जुन्या वस्तू नव्यासारख्या चमकवून, त्या दुरुस्त करून गोरगरिबांना दान करण्यासाठी शहरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वस्तू जमा करून आदिवासी पाड्यावर तसेच, जिल्ह्यातील विविध अनाथाआश्रम व वृद्धाश्रमापर्यंत पोचविल्या जात आहेत. त्याचबरोबर, जुन्या वस्तू या फेकण्यासाठी नव्हे तर, त्या दान करण्यासाठी आहेत. त्यासाठी, त्या वस्तूंप्रती आदरभाव ठेवून गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. त्यासाठी, सोसायट्यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
शहरातील विविध सोसायट्यांनी आतापर्यंत चपला, बूट, जुनी खेळणी, पुस्तके, सायकल, कपडे, स्टेशनरी, मोबाईल, संगणक अशा विविध प्रकारच्या वस्तू जमा करून दान केल्या आहेत. शिवाय, त्या सर्व वस्तू सोसायटीच्या आवारात जमा करून छोटेखानी कृतज्ञता कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्व सदस्यांना सूचना देवून सोशल मीडियावर संदेश पाठवून जनजागृती केली आहे. त्यानंतर, प्रत्येकजण वैयक्तिक किंवा सोसायटीच्या माध्यमातून वस्तू दुरुस्ती करीत आहेत. बरेच जण, सोसायटीच्या बैठकीनंतर मेंटेनन्समधून हा खर्च देत आहेत.

कपडे देखील धुवून इस्त्री करून जमा केले जातात. तसेच, खेळणीदेखील दुरुस्त केली जातात. त्याचबरोबर, पुस्तकांना कव्हर लावून नवीन केली जातात. लहान मुलांच्या व युवकांच्या सायकल देखील दुरुस्त करून आश्रमशाळांमध्ये मुलांना शिक्षणाची वाट सोपी होण्यासाठी सुपूर्द केल्या जात आहेत. या सायकलवरुन त्यांचा पुढील शिक्षण प्रवास सुखकर होण्यासाठी ही धडपड सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरु आहे.
--
आत्तापर्यंत संपर्क बाल आशाघर- ॲंबी व्हॅली, माहेर - केंदूर सेंटर, बालविकास संस्था - भीमाशंकर, बालविकास - चाकण, विकास अनाथ आश्रम - सोनावणे वस्ती, किनारा - रुपीनगर, सेवासंकल्प प्रतिष्ठान - बुलडाणा, समर्पण प्रतिष्ठान - अमरावती, अनामप्रेम - नगर, स्नेहालय - नगर, माइ बाल भवन : मामुर्डी, धुळे : खानदेश आश्रमशाळा या सर्व संस्थांपर्यंत शिवांजली फाउंडेशनच्या माध्यमातून मदत पोचविण्यात आली आहे.

पंढरपूरमधील पालवी संस्थेला १० संगणक जमा करून देण्याचा प्रयत्न आहे. धुळे व नंदूरबारमधील मोरोबावाडीतील आदिवासी आश्रम शाळेला अवांतर वाचनाची पुस्तके दिली आहेत. धुळ्यातील खानदेश आश्रमशाळेला संगणक, शिलाई मशिन, मोबाईल कोर्स शिकविण्यासाठी पैशांच्या स्वरूपात मदत केली आहे. अंगणवाड्यांची पेंटींग व साफसफाई देखील आम्ही केली आहे. साचलेली रद्दी देखील विकून त्यातून येणाऱ्या पैशांतून गरिबांना मदत केली आहे. याच जुन्या वस्तूंचा वापर करून आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली जाते याहून वेगळा आनंद आम्ही पाहिला नसल्याचे स्वयंसेवक कानिफ फत्तेपूरकर यांनी सांगितले.
--
तुम्हीही घ्या पुढाकार...
सोसायट्यांमधून कचरा काढून बाहेर फेकला जातो. त्याप्रमाणे, फेकलेल्या वस्तू देखील आम्हाला नको आहेत. या मानसिकतेतही बदल होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मदतीचा हात हवा आहे. सोसायट्यांमध्ये एप्रिल, मे महिन्यात नवरात्री, दिवाळी, ख्रिसमस व गणेशोत्वासाच्यावेळी दान केलेल्या वस्तू आम्ही जमा करतो. दर शनिवारी व रविवारी देखील प्रबोधनासाठी कॅम्पेनिंग केले जाते. शिवांजली हेल्पिंग हॅंडस पुरस्कृत तारांगण या संस्थेच्या माध्यमातून कानिफ फत्तेपूरकर, सागर मिसाळ, बाबासाहेब काळे, तेजस थोरवे, पूजा काळे, विजय जाधव, शीतल जाधव, स्नेहल मिसाळ, सुनील चाफेकर यांच्यासह अनेकजण स्वयंस्फूर्तीने एकत्रित येऊन हे काम करत आहेत. त्यासाठी सागर मिसाळ : ९८२२९१८७७३ , तेजस थोरवे: ९५२९६५८०४४ या स्वयंसेवकांकडे या क्रमांकावर संपर्क साधल्यास तुम्ही तुमच्या वस्तू दान करून शकता.
--
गेल्या बारा वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवीत आहेत. सोसायट्यांनी खरंच पुढाकार घेतल्यास नक्कीच गरिबांना फायदा होइल. या वस्तू त्यांच्यासाठी फार उपयोगी असतात. एका सोसायट्यांनी इतर सोसायट्यांना मेसेज द्यावा. वाकड मधील मॅक्झिमा सोसायटीने ५० शर्टस नवीन खरेदी करून दिले होते. चिंचवडमधील दर्शन हॉल समोरील सोसायटीने २८ सायकली भेटी
दिल्या. इतर सोसायट्यांनी
जनावरांसाठी औषधे, स्टेशनरी, जुने लॅपटॉप व संगणकाची मदत केली आहे.
- सागर मिसाळ, स्वयंसेवक
--
फोटो ः 16520