
ग्राहकांची फसवणूकप्रकरणी बिल्डरसह व्यवस्थापकावर गुन्हा
पिंपरी, ता. ७ : फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेतले. मात्र, नंतर ठरलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण न करता व फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकांची फसवणूक केली. तसेच ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला. या पैशांबाबत विचारणा केली असता, ग्राहकांना धमकी दिली. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूगाव येथे घडला.
राजेंद्र शशिधर उमदी (रा. टाटा हौसिंग सोसायटी, सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार सत्यविजय हेडा (वय ४२, रा. सुखवानी रेसिडेन्सी, दापोडी), मॅनेजर राहुल माने (सूर्यनगरी, पिंपळे गुरव) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कस्तुरी डेव्हलपर्सतर्फे आरोपींनी चव्हाणनगर येथील गाथा मंदिराजवळील कस्तुरी प्रीमियम येथे वन बीएचके फ्लॅट बुकिंगच्या नावाने फिर्यादीकडून दहा लाख ४२ हजार ७५१ रुपये धनादेश व एनइएफटीद्वारे घेतले. फिर्यादींसोबतच इतर वीस ग्राहकांनीदेखील एक, दोन बीएचके फ्लॅट बुकिंग केले. त्याच्या खरेदीसाठी प्रत्येकाने दोन कोटी १६ लाख ७४ हजार २११ रुपये ऑनलाइन, धनादेश व एनइएफटीद्वारे दिले. यामध्ये आरोपींनी फिर्यादीसह इतर वीस ग्राहकांकडून एकूण दोन कोटी २७ लाख १६ हजार ९६२ रुपये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली घेतले. त्यानंतर ॲग्रिमेंट करून देखील ठरलेल्या वेळेत अथवा त्यानंतर देखील अद्यापपर्यंत ग्राहकांना फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करून दिले नाही. तसेच त्याचा ताबाही न देता त्यांची फसवणूक केली. या संपूर्ण रकमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला.
--------------------
हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ
पिंपरी, ता. ७ : हुंड्यामध्ये भरपूर पैसे व सोने न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय २७), सासरा (वय ५०) व सासू (वय ४६, सर्व रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत, जि. नगर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी हुंड्यात भरपूर सोने दिले नाही, व्यवसायासाठी पैसे दिले नाहीत तसेच आरोपी पतीला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे होते. या कारणासह कौटुंबिक कारणावरून वारंवार फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. क्रूर वागणूक देत छळ केला. घरात बंद करून ठेवले. तसेच सासऱ्याने फिर्यादीशी गैरवर्तन केले.
------------------
चिखलीत रोकड लुटल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी, ता. ७ : तरुणाला बेदम मारहाण करून रोकड लुटल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला.
याप्रकरणी विष्णू धोंडिराम बिराजदार (रा. भावेश्वर हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे साने चौक ते झेंडा चौक या मार्गाने जात असताना दुचाकीवरून आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एका आरोपीने दांडक्याने त्यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. तर इतर आरोपींनी फिर्यादीशी झटापट करून त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
हिंजवडीत मोबाईल हिसकावला
पिंपरी, ता. ७ : मोबाईलवर बोलत जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावला. ही घटना हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी ध्रुव हसमुखलाल अखाणी (रा. फेज दोन, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मोबाईलवर बोलत जात असताना विप्रो सर्कल रोडकडून एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादीकडील पन्नास हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून ते पसार झाले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------