टोलनाका बंद करा अन्यथा आंदोलन चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोलनाका बंद करा अन्यथा आंदोलन
चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा इशारा
टोलनाका बंद करा अन्यथा आंदोलन चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा इशारा

टोलनाका बंद करा अन्यथा आंदोलन चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा इशारा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथे असलेला टोलनाका काही महिन्यांपूर्वी बंद केला होता. मात्र, पुन्हा हा टोल सुरू केला असून, सामान्य वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून वसुली सुरू केली आहे. याचा निषेध करीत संबंधित टोल वसुली तत्काळ बंद करावी, अन्यथा स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन पाठवले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, मोशीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद केला होता. मात्र, हा टोलनाका पुन्हा सुरू करून वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे. मोशी आणि चांडोली टोलनाका येथे सुधारित पथकर लागू करण्याबाबत प्राधिकरणाने ५ जानेवारी रोजी सूचना जारी करण्यात आली आहे.
वास्तविक, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. यामध्ये आता नागरिकांना आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोलनाक्‍यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
---
नागरिकांची लूट थांबवा
या टोलनाक्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून, नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. एकीकडे वारंवार वाहतूक कोंडी होत असून याचे नियोजन करण्यात येत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न धुळखात पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाका बंद करावा आणि स्थानिक नागरिकांची होणारी लूट थांबावी, अशी आग्रही मागणी आहे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, सर्वसामान्य वाहनधारकांच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी.