पिंपरी शहरातील ५३,७३५ मतदार घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voter lists
शहरातील ५३,७३५ मतदार घटले

Pimpri Vidhansabha : पिंपरी शहरातील ५३,७३५ मतदार घटले

पिंपरी - मतदार ओळख पत्राला आधार कार्ड लिंक; नाव, वय, पत्यात दुरुस्ती; मयत व नवीन नोंदणी अशा दुरुस्त्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी ३१ मे रोजी जाहीर मतदार यादीच्या तुलनेत आता शहरातील मतदारसंख्येत ५३ हजार ७३५ ने घट झाली आहे.

यात चिंचवड व भोसरीसह पिंपरी मतदारसंघाचाही समावेश आहे. या तिन्ही मतदारसंघ मिळून १४ लाख ३७ हजार ३८३ मतदार असून ताथवडेमध्ये नऊ हजार ५७५ मतदार आहेत. मात्र, ताथवडेचा समावेश भोर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यासह शहरातील एकूण मतदारसंख्या १४ लाख ४६ हजार ९५८ झाली आहे.

महापालिकेसाठी मतदारयादी

महापालिका निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २३ जून रोजी महापालिकेने प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. निवडणूक विभागाच्या लेखनिकाकडून झालेल्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव असूनही महापालिकेच्या यादीत नाव नसणे या संदर्भात दुरुस्त्या केल्या होत्या. मात्र, निवडणूक लांबली. ती अद्याप झालेली नाही.

एक जानेवारीनुसार ५४ हजारांने वाढ

महापालिकेची पंचवार्षिक मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिका निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना व लॉकडाउनच्या कारणामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर ओबीसी आरक्षण व राज्यातील राजकीय घडामोडी यामुळे निवडणूक लांबली आहे. फेब्रुवारी २०२२ ला निवडणूक होईल, यासाठी एक जानेवारी २०२२ रोजी जाहीर केलेल्या मतदारयादीनुसार शहराची मतदारसंख्या १४ लाख ४६ हजार १४९ होती. ३१ मे रोजी जाहीर झालेल्या पुरवणी यादीनुसार त्यात ५४ हजार ५४४ मतदारांची भर पडून एकूण मतदारसंख्या १५ लाख ६९३ झाली होती.

विधानसभानिहाय याद्या

जिल्हाधिकारी कार्यालयाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या महापालिकेकडे अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्या मिळाल्यानंतर त्यांची प्रभागनिहाय विभागणी केली जाईल. त्यानंतर प्रभागनिहाय मतदारांची संख्या कळेल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

इथे शोधा आपले नाव

- सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध विधानसभानिहाय अंतिम मतदारयादी

- संकेतस्थळ - www.nvsp.in आणि www.ceo.maharashtra.gov.in

असे आहेत मतदार

तारीख / एकूण मतदार

३१ मे २०२२ / १५,००,६९३

५ जानेवारी २०२३ / १४,४६,९५८

मतदार घट / ५३,७३५

विधानसभानिहाय मतदार (५ जानेवारी २०२३)

मतदारसंघ / मतदारसंख्या

चिंचवड / ५,६६,४१५

पिंपरी / ३,५७,२०७

भोसरी / ५,१३,७६१

भोर (ताथवडे) / ९५७५

एकूण / १४,४६,९५८

मतदारांचे वर्गीकरण

मतदारसंघ / पुरुष / महिला / इतर

चिंचवड / ३,०१,६४८ / २,६४,७३२ / ३५

पिंपरी / १,८८,५९९ / १,६८,५८८ / २०

भोसरी / २,८२,७६४ / २,३०,९१२ / ८५