चिखलीत ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलीत ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला उत्साहात
चिखलीत ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला उत्साहात

चिखलीत ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः चिखली येथील महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयामध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. किशोर यादव यांनी ‘आरोग्याचा महामंत्र आणि तरुणाई’ या विषयावर गुंफले.
उद्‍घाटन माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे कार्यवाह राजेंद्र घावटे, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध जलतज्ज्ञ व महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील हे होते. कार्यक्रमासाठी देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्निलआप्पा काळोखे, कवी स्वप्नील चौधरी, डॉ. प्रणाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. किशोर यादव यांनी तरुणाईला संबोधित करताना सांगितले की, तारुण्यांमध्ये आपण आवश्यक बाबींचा कंटाळा करतो, त्याचाच परिणाम आरोग्यावर होतो. पुढील आयुष्यात दुष्परिणाम जाणवतात. फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशल मीडियात अडकलेली पिढी ही जर मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम झाली नाही तर आयुष्यात अपयशी ठरते. म्हणून आरोग्याचा सर्व बाजूनी विचार होणे महत्त्वाचे आहे.’’ असे सांगून आहार, विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य आदी विषयावर डॉ. यादव यांनी प्रकाश टाकला.
गोलांडे यांनी या ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे यश मांडत असताना ही व्याख्यानमाला गेले सात वर्ष काम करते आहे. येणाऱ्या पिढ्यांना वैचारिक प्रबोधन करीत आहे, असे म्हटले. घावटे म्हणाले, ‘‘प्रत्येक नव्या वर्षांमध्ये आपण काहीतरी नवा संकल्प केला पाहिजे. तरुणाई ही देशासाठी मोठी शक्ती आहे. त्यासाठी श्रवण संस्कार महत्त्वाचे आहेत. आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर शिक्षणाबरोबरच व्यावहारिक, सामाजिक प्रबोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यासाठी व्याख्यानमाला उपयुक्त ठरतात.’’ अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनिल पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या बाबतीत सकारात्मक राहावे. सामाजिक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व घडवताना बऱ्याच गोष्टींना महत्त्व आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये अशा गोष्टी आत्मसात करायच्या असतात. शिवाय त्या गोष्टी स्वतःहून आत्मसात करायच्या असतात.’’ या वेळी स्वप्नील चौधरी त्याचबरोबर सचिन पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य प्रा. प्रदीप कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सिद्धार्थ डोंगरे यांनी केले. आभार प्रा. गणेशराज कसबे यांनी मानले.