
धक्कादायक! अनुदानित दोन शाळांमध्ये अवघे तीन व चार विद्यार्थी
आशा साळवी
पिंपरी, ता.१० ः शहरात दोन खासगी अनुदानित प्राथमिक शाळा अशा सापडल्या आहेत की, त्यांची विद्यार्थी संख्या अवघी तीन व चार आहे. तरीही त्यांच्यासाठी दोन व सात शिक्षक आहेत. त्यांना ७० ते ८० हजार रुपये वेतन आहे. दरवर्षी बोगस पटसंख्या दाखवून शंभर टक्के अनुदान लाटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालय (किवळे) आणि कमला नेहरू प्राथमिक विद्यालय (चिंचवड स्टेशन) अशी त्यांची नावे आहेत.
शहरात महापालिका, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा आहेत. त्यांच्यातील पट गळतीची नेमकी कारणे शोधणे, त्यावर उपाय शोधणे आणि नेमकेपणाने काम करण्यासाठी शासनाने २० पटाखालील शाळा शोधण्याचे काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत हा प्रकार उघडकीस आला.
दोन्ही शाळांना पहिली ते सातवीपर्यंत वर्ग मान्यता आहेत. चिंचवड स्टेशनच्या शाळेतील वर्गखोल्या पडक्या आणि गळक्या स्थितीत आहे. कधीही छप्पर पडून विद्यार्थी जखमी होतील, अशी अवस्था आहे. शाळांचा दर्जा आणि पटसंख्या वर्षागणिक घटलेली आहे. सुमारे १० पटसंख्या बोगस दाखवली जात आहे. सध्या पाच विद्यार्थी पटावर आहेत. त्यापैकी दोघे-तिघे सतत गैरहजर आहेत. तरीही एक मुख्याध्यापिका आणि चार शिक्षक आहेत. किवळेची शाळा म्हणजे पत्र्याच्या दोन छोट्या खोल्या आहेत. यामध्ये पहिली ते चौथीचे वर्ग भरतात.
अनुदानाची उधळपट्टी
विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर प्रमाण ३०ः१ आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असला पाहिजे. ज्ञानज्योतीमध्ये तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक आणि नेहरू शाळेत चार विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षक कार्यरत आहेत. १५० विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापकपद असते.
- अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या नाही. तिकडे या शिक्षकांचे समायोजन करणे गरजेचे आहे. चार विद्यार्थ्यांमागे पाच शिक्षक म्हणजे या शाळांवर वर्षानुवर्ष अनुदानाची उधळपट्टी झाली आहे.
- दुसरीकडे शहरातील २० टक्के अनुदानित शाळांमध्ये शिक्षक १५ हजारांवर काम करत आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाच्या आशिवार्दाने बोगस विद्यार्थीसंख्या दाखवून विविध योजनांचा लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्यांना संस्थांवर शिक्षण विभागाने कारवाई करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची प्रगती खुंटली
विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यातील ईर्षा हरवलेली आहे. ते एकाकी पडले आहेत. खो-खो, कबड्डी सारख्या सांघिक खेळात भाग घेता येत नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे.
--
‘सकाळ’ने बुधवारी केलेल्या पाहणीत नेहरू विद्यालयात दुसरी, पाचवी व सातवीच्या वर्गात एक-एकच विद्यार्थी बसलेला होता. तर तिसरी व चौथीचा वर्ग भरलाच नव्हता. हीच परिस्थिती किवळेतील ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालयाची आहे.
--
शिक्षकांचा बदलीसाठी अर्ज नाही
इतर शाळांमध्ये शिक्षकांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. पण या शाळांमधून कोणीही बदलीसाठी एकदाही अर्ज दिलेला नाही. वास्तविक संच मान्यतेनुसार ते अतिरिक्त ठरले आहेत. तरीही त्यांचे शेजारच्या शाळेत समायोजन झालेले नाही. बोगस पटसंख्या व शिक्षकांचा चुकारपणा यामुळे शिक्षण विभागाकडून कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
आकडे बोलतात
इयत्ता - ज्ञानज्योती कमला नेहरू
पहिली व दुसरी (एकत्र वर्ग) ३ ०
तिसरी - ० १
चौथी - ० १
पाचवी - १ १
सहावी- ० ०
सातवी - १ ०
कोट
‘‘या दोन्ही शाळांची पाहणी करून चौकशी करण्यात येईल. त्याचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यात येईल. ’’
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
फोटो
१७४८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५