ज्ञानजोती शाळा बारा वर्षापूर्वीही बोगस पटसंख्येत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानजोती शाळा बारा वर्षापूर्वीही बोगस पटसंख्येत
ज्ञानजोती शाळा बारा वर्षापूर्वीही बोगस पटसंख्येत

ज्ञानजोती शाळा बारा वर्षापूर्वीही बोगस पटसंख्येत

sakal_logo
By

पिंपरी, ता.१४ ः कमला नेहरू प्राथमिक विद्यालय (चिंचवड स्‍टेशन) आणि ज्ञानज्योती प्राथमिक विद्यामंदिर (किवळे ) यांनी गेल्या १०-१५ वर्षापासून बोगस पटसंख्या दाखवत आहे. यातील ज्ञानज्योती शाळा २०११च्या पट पडताळणी मोहिमेमध्ये बोगस सापडली होती. त्याप्रकरणी संस्था चालकांना आठ लाखाचा दंड बजावला होता. अद्याप या शाळेने दंड भरलेला नाही, याउलट गेल्यावर्षी जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक, संचालक आणि महापालिकेच्या शिक्षण विभागा विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पटसंख्या अभावी कमला विद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव २०१२ पासून शिक्षण विभागात पडून आहे. तरी तत्कालीन प्रशासन अधिकाऱ्यांनी राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या संस्था चालकांवर काहीच कारवाई केली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

नेमके आरोपी कोण?
बोगस पटसंख्या व अनुदान लाटणे या प्रक्रियेत संस्थाचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ते जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, महापालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्या चिरीमिरीमुळे बोगस पटसंख्या दाखवून शाळा कोट्यवधी रुपयाचे अनुदान लाटत आहेत. दरवर्षी तीन वर्षांनी शाळांना जिल्हा परिषदेकडून ‘स्वमान्यता’ घ्यावी लागते. त्याची शिफारस महापालिका शिक्षण विभाग करते. मग गेल्या १०-१२ वर्षापासून विद्यार्थी गळती झाली होती. त्याचे पर्यवेक्षण महापालिकेच्या पर्यवेक्षकांनी केले नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या शाळेतील शिक्षक ड्रॉप बॉक्समधील मुले पटावर दाखवत होती. ही शाळा विद्यार्थीअभावी १० वर्षापूर्वीच बंद होणे अपेक्षित होते. हाच प्रकार ज्ञानज्योतीने केला आहे. २०११ मध्ये झालेल्या बोगस पट पडताळणी मोहिमेत सापडली होती. तरी शासनाने थेट कारवाई केली नाही. दंड भरण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या पत्रानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने पत्रव्यवहार केल्‍यावर शाळेने न्यायालयात धाव घेतली आहे.

चाकणवरून दोन विद्यार्थी
कमला नेहरूमध्ये सध्या पट टिकवून ठेवण्यासाठी चक्क चाकणवरून दोन विद्यार्थी आणले जात आहेत. इयत्ता तिसरी आणि सातवीत ते विद्यार्थी येतात. त्यांना चाकणमध्ये शाळा नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

यासाठी विद्यार्थ्यांची बनावट नोंदणी
विद्यार्थ्यांची बनावट नोंदणी करून अतिरिक्त तुकड्या व शिक्षकांच्या पदांना मंजुरी, शैक्षणिक शुल्क, साहित्य, माध्यान्ह भोजन आदींचे कोट्यवधींचे अनुदान लाटत आहेत. विद्यार्थ्यांची बनावट नोंदणी आणि शिक्षक अतिरिक्त असल्याचे आढळून आल्यावर या प्रकरणी शाळांची मान्यता काढून अधिकार शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना आहेत. तरी १० वर्षात राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.


कमला नेहरू प्राथमिक शाळा
शैक्षणिक वर्ष - विद्यार्थी संख्या
२०१९-२० -१०
२०२०-२१ -७
२०२१-२२ -४
२०२२ -२३- ८

कोट
‘‘दोन्ही शाळांना नोटीस बजावली आहे. तुमचे वेतन अनुदान का थांबवू नये, याचा खुलासा मागविला आहे. धोकादायक जागेत शाळा भरवली जात आहे. ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे. दोन्‍ही शाळांनी बोगस पटसंख्‍या दाखविली आहे, असा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे दिला आहे.’’
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग