ग्रामीण जीवनाचा बाज त्याने आणलाय साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण जीवनाचा बाज
त्याने आणलाय साज
ग्रामीण जीवनाचा बाज त्याने आणलाय साज

ग्रामीण जीवनाचा बाज त्याने आणलाय साज

sakal_logo
By

‘आमच्याकडे अंघोळीसाठी चुलीवरचे गरमागरम पाणी मिळेल,’ ‘खास नदीतील शुद्ध पाण्यापासून बनवलेल्या स्वयंपाकाचा मनमुराद आनंद लुटा,’ ‘गारगोटीपासून पेटवलेल्या आगीत भाजलेले अश्‍मयुगीन चवीचे मटण मिळेल,’ ‘ग्रामीण भागातील अस्सल अनुभव आमच्या ‘गावगाडा’ वर मिळवा.’ ‘जे जे गावाकडे, ते ते आमच्याकडं’ अशा पाट्या पाहिल्यावर नितीनने गाडी थांबवली व तो खाली उतरला.
‘‘सायब, रामराम ! तुमाला गावाकडं आल्यासारखं वाटंल. तुमी बेलाशक आठ- दिस राहा. ’’ धोतर व कोपरी घातलेल्या मॅनजरने स्वागत करत म्हटले. नितीनने इकडे- तिकडे पाहिले तर सगळीकडे ग्रामीण माहोल होता. एक बाई नदीवरून पाणी आणत होती तर चावडीवर काहीजण शिळोप्याच्या गप्पा मारण्यात दंग झाले होते. आपलं आख्खं आयुष्य शहरात गेलं पण गावाकडं लोकं कशी जगतात, हे आपण फक्त पुस्तकात व चित्रपटातच पाहिलंय. त्यामुळे आता या लोकांमध्ये राहून, अस्सल ग्रामीण जीवन अनुभवायचे त्याने ठरवले.
‘‘साहेब, एका दिसाला फकिस्त पाच हजार रूपय द्यायचे आणि ग्रामीण अनुभवात डुंबायचे. फक्त शेणखतावर पिकवलेलं धान्य तुमाला देणार आणि इशेश मंजे सगळा सयपाक आमी चुलीवर करतो. अगदी अंगोळीच्या पाण्यापासून ते तुमच्या दाढीला जे गरम पाणी देणार, तेसुद्धा चुलीवर गरम करूनच देणार.’’ मॅनेजरने सांगितल्यावर नितीन एकदम खुश झाला. त्याने पैसे भरले.
‘‘तमाशा आहे का?’’ नितीनने विचारले.
‘‘अवं गावाकडं काय वर्षभर तमाशा नसतुया. तो केवळ जत्रेलाच असतुया.’’ मॅनेजरने म्हटले.
‘‘तुम्ही निम्मं ग्रामीण आणि निम्मं शहरी कसं काय बोलताय.’’ नितीनने विचारले.
‘‘सायब, मी मूळचा पुण्याचा आहे. महिनाच झालाय येथं नुकरीला लागून. त्यामुळं थोडा प्रॉब्लेम हाये. पण मी गाववाल्यांकडे शिकवणी लावलीया. लवकरच शंबर टक्के ग्रामीण बाजाचं बोलंन.’’ मॅनेजरने माहिती दिली.
त्यानंतर नितीन गावगाड्यात फिरायला गेला. पारावरल्या मंडळींनी त्याला तंबाखूची आॅफर दिली.
‘‘लई दिसानं गावाकडं.’’ एक टोपीवाला बोलला. मग तो अजून पुढे गेला. एक बाई लाकडं तोडत असल्याची त्याला दिसली.
‘‘चुलीसाठी लाकडं तोडतीया.’’ त्या बाईने न विचारताच माहिती दिली. मग नितीन थोडा पुढे गेला. एका बाईला तिचा नवरा दारू पिऊन मारत असल्याचे दिसले. नितीनने त्याचा हात पकडला.
‘‘ए तू कोण रं, मला अडवणारा.’’ बाईच्या नवऱ्याने नितीनला दम भरला. त्यामुळे नितीनने माघार घेतली. थोड्यावेळाने तो
परत फिरला. त्यावेळी एक बाई रस्त्यावर गोधडी शिवत होती.
‘‘केवढ्याला गोधडी आहे.?’’ त्याने बाईला विचारले.
‘‘दोन हजारापासून दहा हजारापर्यंत किंमती हायती. आमच्यासारख्या खेड्यातल्या बायांनी त्या शिवल्यात.’’ त्या बाईने उत्तर दिले. नितीनला काहीतरी शंका आली.
‘‘अहो, मघाशी लाकडं तोडताना तुम्हीच होता. दारूड्या नवऱ्याचा मारही तुम्हीच खात होता आणि आता गोधडीपण तुम्हीच विकताय. तुमच्या गावात तुम्ही एकच बाई आहात का? काहीतरी घोळ दिसतोया.’’ नितीनने विचारले.
‘‘व्हॉट डू यू मीन, व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ ती ग्रामीण बाई इंग्रजीत बोलल्याचे पाहून नितीनला आश्‍चर्य वाटले. नंतर तिने जीभ चावली.
‘‘आमी प्रौढसाक्षरतेच्या वर्गात इंग्रजी शिकलुया.’’ तिने खुलासा केला. काहीतरी गौडबंगाल आहे, असं त्याला संशय आला. मग त्याने तिला खरं सांगण्यास सांगितले.
‘‘अहो, मी पुण्याची आहे. पण मला येथं नोकरी लागली. ग्रामीण बाईची भूमिका करणं, हेच माझं काम आहे.’’ त्या बाईने खुलासा केल्यावर नितीनने कपाळावर हात मारला.
तेवढ्यात सिलिंडरने भरलेली गाडी हॉटेलच्या आवारात थांबली होती व दोघेजण त्यातील सिलेंडर आत नेत होते, हे दृश्‍य पाहिल्यावर नितीनचा राग अनावर झाला.