सुसगावात टोळक्याकडून 
तरुणावर कोयत्याने वार

सुसगावात टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : जुन्या वादावरून सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सुसगाव येथे घडली. अर्जुन रावसाहेब पवार (रा. पारखेवस्ती, सुसगाव, मूळ- परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदेश टेमकर, आदेश खलसे (दोघेही रा. पारखेवस्ती, सुसगाव), व्यंक्या, पिल्या, आकाश कांबळे, गणेश चौधरी (दोघेही रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे सुसगाव येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी घरून रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, कबड्डी मैदानावर आले असता आरोपींनी कोयते व हातात दगड घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. होळीच्या दिवशी झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपी आदेश, आकाश व गणेश हे कोयता घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आले. आकाश याने ‘तुला होळीच्या दिवशी समजावून सांगितले होते तरी तुझ्यात सुधारणा झाली नाही का’ असे म्हणत त्याने कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी हे बचावावासाठी पळून जात असताना आकाश व गणेश यांनी फिर्यादीच्या पायावर कोयता मारून जखमी केले. तर इतर आरोपींनी फिर्यादीला दगड मारून जखमी केले.

ताथवडेत साडे चार किलो गांजा जप्त
बेकायदारित्या गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून साडे चार किलो गांजा जप्त केला. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली. आकाश सुदाम थोरात (निंबाळकरनगर, ताथवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून भावड्या ऊर्फ अंकुश काळे (रा. खरडा, सोनेगाव चौक, ता. जामखेड, जि. अहमदनगर) हा फरार आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ताथवडेतील रघुनंदन चौक येथे सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लाख १४ हजार ७५० रुपये किमतीचा चार किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. हा गांजा त्याने काळे याच्याकडून आणल्याचे सांगितले.

चऱ्होलीत मारण्याची धमकीप्रकरणी एकाला अटक
महिलेची दुचाकी रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार चऱ्होली येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन तापकीर (वय ३८, रा. तापकीरवस्ती, चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे वडील व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या त्यांच्या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घरी जात होत्या. दरम्यान, वडमुखवाडी येथे आरोपींनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवली. पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून फिर्यादीचा हात धरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने त्यांच्याविरुद्ध तक्रार देऊ, यासाठी फिर्यादीचे पती व दीर यांनाही आरोपींनी धमकी दिली.

लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ
लग्नात मानपान न केल्याने, हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ केला. हा प्रकार हिंजवडीतील अनंतानगर येथे घडला. पीडित विवाहितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल विलास सांगळे (वय २६), विलास सांगळे (वय ५५), वैभव विलास सांगळे (वय २४), एक महिला (वय ५०, सर्व रा. लोकमान्यनगर, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सासरच्या लोकांनी विवाहितेसोबत वारंवार वाद घालून शिवीगाळ केली. लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेच्या आई-वडिलांकडे पैशांची मागणी केली. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून लग्नात दिलेले स्त्रीधन तिच्याकडून घेतले.

निगडीत पाऊणलाखाची घरफोडी
दरवाजाचे कुलूप कापून घरात शिरलेल्या चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडीतील गंगानगर येथे घडली. ४८ वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीत चोरट्यांनी घराचे कुलूप कापून घरातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने, २५ हजारांच्या चांदीच्या वस्तू व १५ हजाराची रोकड असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com