दुकानासह जाळण्याची 
धमकी देत हप्त्याची मागणी

दुकानासह जाळण्याची धमकी देत हप्त्याची मागणी

पिंपरी : दुकानचालकाला दुकानासह जाळून टाकण्याची धमकी देत हप्त्याची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार पिंपरी मार्केटमध्ये येथे घडला. माधव ऊर्फ उमाकांत भगवान वाघमारे (वय १८, रा. पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) याला अटक केली असून आतिष शिरसाट व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे त्यांच्या पिंपरी मार्केटमधील कपड्याच्या दुकानात असताना आरोपी तेथे आले. फिर्यादीला शिवीगाळ करून वाघमारे म्हणाला, ''तुला कापड दुकान चालवायचे असेल तर मला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर तुला दुकानासह जाळून टाकतो'' अशी जिवे मारण्याची धमकी दिली. पाचशे रुपये हप्ता घेऊन शिरसाट याने दुकानातील तीन शर्ट जबरदस्तीने घेतले. कापड व्यवसाय करायचा असल्यास दहा हजारांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीच्या वडिलांना हाताने मारहाण केली.

तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक
तडीपार असतानाही हद्दीत आलेल्या आरोपीला निगडी पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे केली. युवराज रतन राजपुरोहित (वय २४, रा. पीसीएमसी वसाहत, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. युवराज याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो पूर्वपरवानगी न घेता हद्दीत आला. त्याच्याकडे कोयताही आढळला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

महिलेची नऊ लाखांची फसवणूक
महिलेची ऑनलाइनद्वारे नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी ओएलएक्स ऍपवर फ्रिज विकण्याबाबत जाहिरात दिली होती. दरम्यान, राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तुमचा जुना फ्रिज विकत घ्यायचा आहे, असे सांगून फिर्यादीला त्याच्या बँक खात्यावर आठ लाख ९७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. यामध्ये फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

सेवानिवृत्त शिक्षकाची सोनसाखळी हिसकावली
पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असता सेवानिवृत्त शिक्षकाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. कल्याण दत्तात्रेय जोशी (वय ७९) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे पीएमपीएमएल बसने निगडी ते मोरवाडी या मार्गाने प्रवास करीत होते. दरम्यान, काळभोरनगर बसथांब्याच्या आसपास चोरट्याने गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांची ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.

हवेत गोळीबार करणारे दोघे अटकेत
पिस्तूल बाळगून हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई जुनी सांगवी येथे करण्यात आली. सुजल राजेंद्र गिल (वय १८, रा. विनायकनगर, नवी सांगवी), रिहान आरिफ शेख (वय १९, रा. साठ फुटी रोड, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार जुनी सांगवीतील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. या
आरोपींनी रविवारी (ता. १६) हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण केली होती.

पिंपरीत एकाला बेदम मारहाण
भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी शशिकांत ईश्वर सोनवणे (रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उज्वल लव्हे (वय २०), सरोज वाघमारे (वय २१) व बळी रोकडे (वय ४०, सर्व रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या पुतणी सोबत भांडण केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com