Water Shortage : पिंपरी शहरात पाणी टंचाई, टँकरचा सुळसूळाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tanker
शहरात पाणी टंचाई, टँकरचा सुळसूळाट!

Water Shortage : पिंपरी शहरात पाणी टंचाई, टँकरचा सुळसूळाट!

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्यावतीने एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण दरवर्षी शंभर टक्के भरते. परंतु; महापालिका सुमारे ४८० दशलक्ष लिटर्स (एमएलडी) पाणी उचलूनही शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेल्याने तो अपुरा पडत आहे. त्यातच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला ४० टक्के म्हणजेच सुमारे १९२ एमएलडी पाण्याची गळती थांबविणे अथवा कमी करणे शक्य झालेले नाही. शहराच्या विविध भागातील पाणी टंचाईचा ‘सकाळ’ने आढावा घेतला असता अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने टँकर लॉबीचा सुळसूळाट झालेला दिसून आला. टँकर माफियांनी या पाण्याच्या व्यावसायातून कोट्यावधी रुपये कमविले आहेत. त्यामुळे ही पाणी टंचाई या लॉबीला पोसण्यासाठी तर केली जात नाही ना, असा सवाल आता नागरिक उपस्थित करु लागले आहेत.

रावेतच्या इलिगन सोसायटीत पाण्याची समस्या गंभीर

किवळे - रावेतच्या इलिगन सोसायटीत पाण्याची समस्या गंभीर झाली असून पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्याने सदनिका धारक त्रस्त झाले आहेत.

- रावेत भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

- दिवसाला पाच टँकर पाण्याची मागणी

- प्रति टँकर ८०० रुपये खर्च नाहक

- १०५ सदनिका धारक त्रस्त

इलिगन सोसायटीत एक बिल्डिंग असून एकूण १०५ सदनिका धारक आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होत असलेला पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. त्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी सध्या दिवसाला पाच टँकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. यासाठी प्रति टँकर आठशे रुपये मोजावे लागत आहेत. यावर पाणी पुरवठा विभागाने तोडगा काढून सदनिका धारकांना दिलासा द्यावा.

- नितीन चौधरी, रहिवाशी, इलिगन सोसायटी, रावेत.

रावेत येथील नॅनो स्पेस, किवळे येथील देवराई सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा

टँकरच्या पाण्यासाठी करावा लागतो खर्च

किवळे - रावेत शिंदेवस्ती येथील नॅनो स्पेस आणि किवळे कोतवालनगर येथील देवराई सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सदनिकाधारकांनी केली आहे. त्यामुळे या सोसायट्यांमध्ये पाण्याची गरज भागविण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करून टँकर मागवावे लागतात.

- नॅनो स्पेसमधील १६८ सदनिकाधारक त्रस्त

- एक टँकर ८०० रुपयांना

- एप्रिलमध्ये वीस दिवसात ५० हजारांचा खर्च

- देवराई सोसायटीत दिवसाला ३ टँकर

- देवराईत ९० सदनिकांना कमी दाबाने पाणी

रावेत शिंदेवस्ती येथील नॅनो स्पेसमध्ये तीन बिल्डिंग असून एकूण १६८ सदनिका धारक आहेत. एअर वॉल लावले तरी पाणी कमी दाबाने येत असल्याने एप्रिल महिन्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला आहे. एक टँकर ८०० रुपयांना पडला.

- सुरज जोशी, रहिवाशी, नॅनो स्पेस सोसायटी, रावेत.

किवळे कोतवालनगर येथील देवराई सोसायटीत ४ बिल्डिंग मधील ९० सदनिकांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने ते सर्व सदनिका धारकांना पुरत नाही. त्यामुळे वापरण्यासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी दिवसाला ३ टँकर मागवावे लागतात. एक टँकर पाच हजार लिटरचा असतो.

- तुषार तरस, रहिवाशी, देवराई सोसायटी, किवळे.

भोसरी - गेल्या काही वर्षापासून चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे सुतोवाच महापालिका आणि लोकप्रतिनिधींद्वारे केले जात होते. मात्र चोवीस तास न करता दिवसाआड होणारा पाणी पुरवठा बंद करून तो रोज करण्याची मागणी भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरमधील नागरिक करताना दिसून येत आहेत. दिवसाआड पाणी त्यातच कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्यामुळे समस्या वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दिघीत २४ तास सोडा फक्त दीड ते दोन तासच पाणी!

दिघीमध्ये तीन वर्षापूर्वी चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या पाइप लाइन टाकण्यात आल्या होत्या. मात्र; चोवीस तास पाणी सोडाच महापालिकेद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यचा संताप नागरिकांद्वारे व्यक्त होत आहे. त्यातही दिघीतील कृष्णानगरसह इतरही भागात फक्त दीड ते दोन तासच पाणी पुरवठा होत असल्यामुळे समस्या वाढल्या असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रवी चव्हाण यांनी केली. त्याचप्रमाणे कृष्णानगरसह काही भागात दुपारी १२ वाजता पाणी सुटण्याची वेळे आहे. मात्र; बुधवारी (ता. १९) दुपारी तीन वाजून गेल्यानंतरही नळाला पाणी आले नव्हते.

इंद्रायणीनगरमध्ये दोन हजार खर्चुन पाण्याचा टँकर...

भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमधील प्रसन्न पॅराडाईज सोसायटीमध्ये गेल्या चार दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याची तक्रार सदनिकाधारकांची आहे. त्याचप्रमाणे बुधवारी (ता. १९) संध्याकाळी पिण्याच्या पाण्याचा टॅंकर दोन हजार रुपये खर्चून मागविल्याचे सदनिकाधारक रमेश कोराळे यांनी सांगितले.

च्रकपाणी वसाहतीत अपुरा पाणी पुरवठा...

भोसरील चक्रपाणी वसाहतीतील काही भागात दुपारी बारा वाजता पाणी सोडले जाते मात्र; कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अक्षयनगर, विश्वकर्मा काॅलनी, गणेशनगर आदी भागात तीन ते चार वाजता पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना एक ते दीड तासच पाणी भरण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे पुरेसे पाणी भरता येत नसल्याची माहिती शशिकांत देसाई यांनी दिली. त्याचप्रमाणे पाण्याची गरज भागविण्यासाठी दहा पंधरा दिवसांतून एकदा पाण्याचा टॅंकर मागवावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजेमुळेही पाण्याची अडचण...

महापालिकेद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र; पाण्याच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांना पुरेसे पाणी भरता येत नाही. त्यामुळे एक दिवस पाणी मिळाले नाही तर; पुढील तीन दिवस पाण्याची समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुष्काळात तेरावा महिना...!

भोसरीतील पीएमटी चौक, गावठाणाच्या काही भागात तर; पाण्याच्या दिवशीच विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार घडतो. त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यास एक फेजचा विद्युत पुरवठा खंडीतच राहतो. महावितरणशी संपर्क साधल्यानंतरच तो पुन्हा सुरळीत होतो. मात्र; यामध्ये बराच वेळ जात असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

पाच तास पाणी पुरवठा सुरळीत व्हावा

भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात दीड ते पाच तासापर्यंत पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा पाणी पुरवठा सर्व ठिकाणी पाच तास करण्याची मागणी नागरिकांची आहे. काही ठिकाणी पाणी अनियमितपणे सोडले जाते. त्यामुळे कामगार वर्गांची अडचण होते. त्यामुळे पाण्याच्या वेळा नियमित करण्याचीही मागणी नागरिकांची आहे.

चिखली - जलशुद्धीकरण केंद्र उभारून शहरातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या चिखली परिसरातील जाधववाडी, कुदळवाडी, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, पेठ क्रमांक १३ व १६ आणि चिखली गावठाण परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र; हा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दबाने तसेच अवेळी कधीही करण्यात येतो. परिणामी या परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे.

चिखली परिसरात दररोज २०० टँकरवर २ लाख खर्च

चिखली परिसरात नव्याने ५७ सोसायच्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा अतिशय अपुरा असल्याने या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना आपली तहान भागविण्यासाठी पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चिखली मोरे वस्ती जाधववाडी कुदळवाडी सह नव्याने निर्माण झालेल्या सोसायटी मिळून परिसरात दररोज सुमारे २०० टँकर मार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. एक टँकर पाणी विकत घेण्यासाठी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज किमान दोन लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.

बांधकामांसाठी मोटार लाऊन पाणी उपसा

चिखली गावठाण, मोरे वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दिवसा आड का होईना पाणीपुरवठा केला जातो. मात्र; या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करणारी नागरिक बांधकामासाठी नळ जोडायला इलेक्ट्रिक मोटर लावून पाणी उपसा करतात. परिणामी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होतो. त्यातच शेकडो सदनिका असलेल्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना एक किंवा दोन नळ जोडाद्वारे केलेला पाणीपुरवठा पुरेसा नसतो. परिणामी हे रहिवासी टँकरद्वारे पाणी मागून आपली तहान भागवत आहेत.

भामा आसखेड धरणातून पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र मार्फत शहरातील भोसरी इंद्रायणी नगर संभाजीनगर अशा अनेक भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र; चिखलीकरांना त्याचा अद्यापही लाभ मिळू शकलेला नाही. दिवसेंदिवस चिखली परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत असून महापालिकेने या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी आत्ताच नियोजन करणे आवश्यक आहे.

- विकास साने, अध्यक्ष, चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी.

अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. दोन हंडे पिण्याच्या पाण्यासाठी तासभर रांगेत उभे रहावे लागते. जे पाणी येते तेही अवेळी, कधीही येते. अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने दररोज व पुर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा.

- रोहिणी पवार, गृहिणी, मोरे वस्ती-चिखली.

दापोडी, पिंपळे निलख भागात टँकरला धंद्याला सुगीचे दिवस

जुनी सांगवी - सांगवी, दापोडी, पिंपळे निलख परिसरात दिवसाआड येणारे पिण्याचे पाणी, दापोडी भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे उन्हाळ्यात टॅंकरद्वारे नागरिकांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या दोन वर्षांत व्यावसायिक बांधकामे ही तेजीत असल्याने बांधकामांनाही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने टॅंकर व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

दापोडी भागातील गुलाबनगर, पवारनगर या चाळी वस्तीतील नागरिकांना कमी दाबाने, दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याचा साठा करावा लागतो. चाकरमानी मंडळी, भाडेकरू रहिवासी यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.

पिंपळे निलख परिसरात टँकरचा भुर्दंड

पिंपळे निलख भागात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सोसायट्यांना टॅंकरचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दापोडी येथील साईपुरम, स्वराज रेसिडेन्सी, बॉम्बे कॉलनी, बेला-आशा सोसायटी आदी सोसायट्यांना आठवड्यातून दोन वेळा टॅंकर मागवावा लागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. मोठा एक टॅंकर एक हजार ते छोटा टॅंकरला पाचशे रूपये याप्रमाणे रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दहा हजार लिटर साठी बाराशे ते दिड हजारांपर्यंत टॅंकर साठी पैसे द्यावे लागतात. कमी दाबाने दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, दुरूस्त्या, अधूनमधून महावितरणचे दुरुस्ती कामाचे होणारे शटडाऊन यामुळे खंडीत होणारा विजपुरवठा आदी कारणांमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ममतानगरला आठवड्यातून दोनदा टँकरची गरज

जुनी सांगवी भागातील ममतानगर भागातील रहिवाशांना आठवड्यातून दोनदा टॅंकरद्वारे पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पाणी कमी दाबाने व अपुरे येते. दिवसा आड येणारे पाणी व दुरुस्तीच्या कामासाठी बंदच्या वेळेत टॅंकर मागवावे लागते.

- रेश्मा लवार, रहिवाशी, उष:काल सोसायटी, जुनी सांगवी.

दापोडीत कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. जे पाणी येते तेही अनियमित असते. त्यामुळे आम्हाला आठवड्यातून दोनदा टॅंकरद्वारे पाण्याची गरज भागवावी लागते.

- अमोल विल्यम, बेला-आशा सोसायटी दापोडी.

अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे काळेवाडीकर त्रस्त

काळेवाडी - विजयनगर, ज्योतिबानगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. दिवसाआड पाणीपुरवठा, त्यात कमी दाबाने, त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- विजयनगर मधील वैभव कॉलनी, गणेश कॉलनी, समर्थ कॉलनी परिसरात सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत महापालिकेकडून होते पाणीपुरवठा

- खुप कमी दाबाने पाणी असल्याने घर वापरासाठी सोडा पण पिण्यासाठीही पुरेसे मिळत नाही पाणी

- या भागात मागील चार वर्षांपासून पाण्याची समस्या

- पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो.

- काही दिवसांनी पुन्हा मागचे दिवस पुढे येतात.

- पाणी ही अत्यावश्यक गरज असल्याने तीच मिळत नसेल तर, काळेवाडीत रहावे कि नाही, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा

नागरिक म्हणतात...

मागील चार वर्षांपासून आमच्या भागात पाण्याचा प्रश्न असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. नको त्या ठिकाणी पाणी भरपुर प्रमाणात सोडले जातो. असे महापालिकेचे नियोजन आहे.

- बबन पाठकर, काळेवाडी.

महापालिका दिवसाआड पाणीपुरवठा करते. त्यातही कमी दाबाने. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिकेला तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

- उषा काटकर, काळेवाडी.

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नागरिकांना सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. विशेष म्हणजे महापालिका या सोयीसुविधा फुकट देत नाही. प्रत्येकाचा टॅक्स घेते. मग, सेवा का दर्जेदार मिळत नाही. ठेकेदार, अधिकारी यांना जमत नसेल तर त्यांना बदलले पाहिजे.

- कोमल काळे, काळेवाडी.

टॅग्स :waterPimpri Chinchwad