भरधाव वाहनाच्या धडकेत निघोजेत पादचाऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव वाहनाच्या धडकेत 
निघोजेत पादचाऱ्याचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत निघोजेत पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत निघोजेत पादचाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By

पिंपरी : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना निघोजे येथे घडली. अनिल सर्जेराव खैरे (वय ३२, रा. काळूस, ता. खेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ अजित खैरे यांनी फिर्याद दिली आहे. अनिल खैरे हे महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर एक समोरील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला.


दिघीत अडीच लाखांची घरफोडी
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने आदी लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिघी येथे घडली. अविराज शांताराम खाडे (रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. सोन्याचे दागिने व ६५ हजारांची रोकड असा एकूण दोन लाख ५३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.


विनयभंग प्रकरणी एकाला अटक
घरात शिरून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार निगडी येथे घडला. मनोज रामचंद्र सिंह (वय २५, रा. रुपीनगर चौकीजवळ, तळवडे ) या असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची २२ वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना आरोपी घरात शिरला. मुलीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला.


चोरीप्रकरणी कामगार दाम्पत्यावर गुन्हा
दुकानातून एक लाख ४३ हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणी दुकानातील कामगार दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेरगाव येथे घडला. प्रकाश गिरी गोस्वामी (वय २७, रा. रजरवारा, कटनी, मध्यप्रदेश) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर मानसिंग रामू पुजारी (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे थेरगाव येथील वाकड रोड येथे दुकान असून आरोपी दांपत्य तेथे कामाला आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या गावी हैदराबाद येथे जाताना दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली एक लाख ३८ हजारांची रोकड व पाच हजारांचा मोबाईल असा एकूण एक लाख ४३ हजारांचा ऐवज आरोपींनी लंपास केला.