पिंपरीत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पिंपरीत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पिंपरी : तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी येथे घडली. प्रवीण राजू शिरठाणे (रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी पायी जात होते. दरम्यान, पिंपरी मार्केट येथे एक कुत्रा त्यांच्या अंगावर धावून आल्याने ते कुत्र्याला शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तेथे उभे असलेल्या आरोपीला गैरसमज झाल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. या वेळी आरोपीने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. हातावरही वार केल्याने बोट कापले.

चोरीप्रकरणी दोघांना अटक
फ्लॅटची साफसफाई करीत असताना ऐवज लंपास केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली. रामेश्वर पंजाबराव देशमुख (वय २४), उत्कर्ष संघपाल दुधमल (वय १९, दोघेही रा. म्हाळुंगे, मुळशी ) अशी अटक केलेल्यांची नावे असून तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्‍युत भवरसी अरोरा (रा. पुनेव्हिले सोसायटी, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या फ्लॅटची साफसफाई करीत असताना कपाटातील पाकिटातून, फिर्यादीच्या पर्समधून ३८ हजार रुपयांच्या रोकडसह तीन हजारांचा मोबाईल चोरला.

बसच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
भरधाव बसने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिघी येथे घडली. शांताबाई शिवराम सालपे (वय ७७) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (वय ३७, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. सालपे या दत्तनगर येथील दिघी चौपाटी समोरील रस्ता ओलांडत होत्या. दरम्यान, आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये बसच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हिंजवडीत तरुणाला बॅटने बेदम मारहाण
क्रिकेट खेळताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून तरुणाला बॅटने बेदम मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. नीरज सिंह सिकलवार, अभिनव (दोघेही रा. कीर्तिगेट, मारुंजी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हर्षल प्रवीण आहिरे (रा. कीर्तिगेट, मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांचा मित्र प्रथमेश शहाजी अवचर (रा. कीर्तिगेट, लक्ष्मी चौक, मारुंजी, मूळ- दौंड) व इतर मुलांसह हिंजवडी येथे क्रिकेट खेळत होते. दरम्यान, चेंडू टाकण्याच्या कारणावरून आरोपी नीरज याने प्रथमेश याला हाताने मारहाण केली. तर अभिनव याने प्रथमेशला मी तुला मारून टाकणार असे म्हणत त्याच्या डोक्यात बॅट मारली.

विनयभंगप्रकरणी एकाला अटक
महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी एकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. हा प्रकार चिंचवडेनगर येथे घडला. स्वप्नील रवींद्र शेळके (वय २४, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या बहिणीसोबत दगडोबा चौक येथून जात असताना आरोपीने फिर्यादीशी गैरवर्तन केले. त्यानंतर दोघींनाही लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com