
वाकडमधील गुन्हेगारी टोळीवर मोका
पिंपरी, ता. २८ : वाकड पोलिस ठाण्याच्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुख शाहरुख युनूस खान (वय २९), विकास ऊर्फ बाळा गोपाळ लोखंडे (वय २६), आनंद किशोर वाल्मीकी (वय २८), जुबेर युनूस खान (वय २२), व्यंकटेश ऊर्फ विष्णू धर्मा कांबळे (वय २१, सर्व , रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, शस्त्र बाळगणे असे एकूण १९ गंभीर गुन्हे वाकड, सांगवी व हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. हे सर्व आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करीत वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
या वर्षात पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण नऊ टोळ्यांमधील १२६ आरोपींवर मोका कारवाई करण्यात आली.