
गुन्हे वृत्त
विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांची एकाला मारहाण
पिंपरी : दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना देहूफाटा येथे घडली.
गौरव राजेश बकाने (रा. डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव चव्हाण (वय २०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मैत्रीणीसोबत एका मित्राची वाट पाहत देहूफाटा येथे दुचाकीवर थांबले होते. त्यावेळी चव्हाण हा विरुद्ध दिशेने आला. त्याने फिर्यादीला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, तूच विरुद्ध दिशेने आल्याचे म्हटल्याचा राग आल्याने चव्हाण याने फिर्यादी गौरव यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यामध्ये गौरव यांच्या कानाला दुखापत झाली.
---------------------------
कंपनीतून साडे तीन लाखांचा माल चोरीला
कंपनीच्या भिंतीचा पत्रा वाकवून साडे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना निघोजे येथील पॉनलटेक कंपनीमध्ये घडली.
याप्रकरणी वेणू कृष्णन (रा. पिंपरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी पॉनलटेक कंपनीतील रॅकवर ठेवलेले सहा वेगवेगळ्या केबलचे बंडल, १७४ किलो वजनाच्या कॉपरच्या पट्या असा एकूण तीन लाख ४५ हजार ३१५ रुपयांचा माल चोरून नेला.
---
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरीतील गणराज कॉलनी येथे घडली.
शुभम प्रकाश खिस्ती (वय २३, रा. बालमटाकळी, ता. शेवगाव, जि.अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीचा आरोपीशी २ डिसेंबर २०२२ रोजी विवाह झाला. मात्र, आरोपीने लग्नानंतर वेगवेगळ्या कारणावरून पत्नीला मारहाण करीत शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.