कामगार दिन विशेष
---------------------
मुलांच्या उच्चशिक्षणासाठी कल्याणकारी ‘हात’
कामगार पित्याची भावना; गेल्या आर्थिक वर्षात १२ हजार जणांना लाभ
कल्याणकारी ‘हात’

कामगार दिन विशेष --------------------- मुलांच्या उच्चशिक्षणासाठी कल्याणकारी ‘हात’ कामगार पित्याची भावना; गेल्या आर्थिक वर्षात १२ हजार जणांना लाभ कल्याणकारी ‘हात’

-----------------------------
पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० ः ‘‘माझ्या मुलीने इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. ती आता आर्यलंडमध्ये एमएस करत आहे. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाकडून ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. मुलगा पुण्यात इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्यालाही तीन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. कामगार व कुटुंबीयांच्या आजारपणासह मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना उपयुक्त ठरत आहेत,’’ हे शब्द आहेत, चिंचवडच्या तानाजीनगर येथील गुणवंत कामगार दत्तात्रेय अवसरकर यांचे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे संत तुकारामनगर, उद्यमनगर व संभाजीनगर अशा तीन ठिकाणी कामगार कल्याण केंद्र आहेत. ‘शिस्त, सेवा, सुधार व समृद्धी असे ब्रीद घेऊन कामगारांच्या कल्याणासाठी मंडळ काम करीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात १२ हजार १६३ कामगारांना विविध योजनांचा लाभ घेतला आहे. त्यासाठी मंडळाने चार कोटी सात लाख ४७ हजार ७८३ रुपये अर्थसाह्य दिले आहे. या माध्यमातून कामगार व कुटुंबीयांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गंभीर आजारासाठी अनुदान
कामगारासह आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले यांना मूत्रपिंड, कर्करोग, ह्रदयरोग, एचआयव्ही, किडनीरोग, क्षयरोग, कॅन्सर, अर्धांगवायू, मेंदूरोग आदी गंभीर आजार झाल्यास शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी अनुदान दिले जाते. एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यास पाच हजार ते २० हजार रुपये आणि एक लाखापेक्षा जास्त खर्च झाल्यास २५ हजार रुपये सहाय्यता अनुदान मिळते.

चालू वर्षासाठी प्रक्रिया सुरू
चालू आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) जास्तीत जास्त कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सध्या ‘एमएससीआयटी’ व गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेचे अर्ज ऑनलाइन स्वीकारणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कामगार कल्याण केंद्रात किंवा www.public.mlwb.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. अर्थसाहाय्य देण्यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण कुटुंबीयांना दिले जात आहे. मंडळाच्या योजना कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी मंडळासह गुणवंत कामगार कल्याण मंडळही जागृती करत आहे. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांची २० मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यांना मंडळाने शिष्यवृत्ती दिली आहे.
- राजेश हजारे, राज्य सचिव, गुणवंत कामगार कल्याण मंडळ

गेल्या वर्षी पात्र ठरलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या सर्व रकमा संबंधित लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केल्या आहेत. या योजनांद्वारे कामगार व कुटुंबातील सदस्यांना शैक्षणिक व इतर बाबतीत मोठे पाठबळ व प्रोत्साहन दिले जाते. तसेच विविध प्रबोधनाचे कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, ताणतणाव मुक्ती, आरोग्य शिबिरे व विविध विषयावर मार्गदर्शन केले जाते. त्यातून कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- समाधान भोसले, सहायक कल्याण आयुक्त

कामगार कुटुंबीयांसाठी योजना
- दिव्यांग कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी टक्केवारीची कोणतीही अट नाही
- अकरावी ते पदव्युत्तर पाठ्यपुस्तकांसाठी ५० टक्के व दिव्यांगांना १०० टक्के अनुदान
- एमएससीआयटी परीक्षा किमान ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यास अभ्यासक्रमाचे ५० टक्के शुल्क अनुदान
- माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना
पाच हजार रुपये शिष्यवृत्ती
- कामगार लेखन साहित्य प्रकाशनासाठी (स्वरचित कथा, कादंबरी, कविता आदी) १० हजार रुपये अनुदान
- शिवणयंत्र अनुदान योजना मंडळाच्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास शिवणयंत्रासाठी ९० टक्के अनुदान
- सर्वसाधारण शिष्यवृत्ती कामगारांच्या मुलांना दहावीपासून उच्चशिक्षणापर्यंत मिळते
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मिळते
- एमपीएससी, यूपीएससी, पीएच डी यांसह परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीही अर्थसाहाय्य.

गेल्या वर्षीचे लाभार्थी (सन २०२२-२३)
योजना / लाभार्थी / रक्कम
सर्वसाधारण शिष्यवृत्ती / १०,९४२ / ३,३७,९१,०००
परदेश शिक्षण शिष्यवृत्ती / ५० / २५,००,०००
क्रीडा शिष्यवृत्ती / ४१ / २,०४,०००
पाठ्यपुस्तक साहाय्य / ३२७ / ३,५६,७७३
एमएससीआयटी / ५८९ / १२,६६,३५०
गंभीर आजार उपचार / ११४ / २१,६०,०००
शिवणयंत्र अनुदान / ७४ / ३,३९,६६०
विशेष गुणवंत विद्यार्थी / २६ / १,३०,०००
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com