गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

सॉफ्टवेअर इंजिनिअरची
१८ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. ३० : युट्युबवरील व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळण्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरची १८ लाखांची ऑनलाइनद्वारे फसवणूक केली. अमर अनिल लोमटे (रा. मंगलनगर, डांगे चौक, मूळ- लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती व बँक खाते धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला व्हाट्सअपवर मेसेज केला. तुम्हाला जॉब ऑफर देण्यात येईल. तुम्हाला यूट्युबवर व्हिडिओ लाईक करून प्रत्येक व्हीडिओला पन्नास रुपये मिळतील. व्हीआयपी सदस्य झाल्यास प्रत्येक व्हीडिओला शंभर रुपये देण्यात येतील. व्हीआयपी सदस्य होण्यासाठी प्रीपेड टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून फिर्यादीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादीने तीन टप्प्यात तब्बल १८ लाख ८० हजार ४०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले. त्यांनतर त्यांना पैसे न देता फसवणूक केली.


वाहनासह साहित्य चोरीला
पिंपरी, ता. ३० : पार्किंगमधील वाहनासह इमारतीतील लोखंडी प्लेट व इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी प्रमोद बाबू कदम (रा. दत्तकृपा बिल्डिंग, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन त्यांच्या घराजवळ पार्क केले होते. दरम्यान, चोरट्यांनी कदम यांच्या वाहनासह शेजारील नवीन इमारतीतील लोखंडी प्लेट, कटर मशिन चोरले.

पार्टटाइम नोकरीच्या बहाण्याने महिलेची साडे तीन लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ३० : पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची साडे तीन लाखांची फसवणूक केली.
याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. व्हाट्सअपवर पार्ट टाइम जॉब असल्याचा फिर्यादी महिलेला मेसेज केला. तुम्ही घरी राहून नोकरी करू शकता, अशी बतावणी करण्यात आली. त्यानंतर टास्क खेळण्यास भाग पाडून त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर सुरुवातीला तीस टक्के पैसे फिर्यादीला परत विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेकडून पुन्हा अधिकचे पैसे घेत तिची तीन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.
------------------------
बसच्या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी, ता. ३० : राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसने धडक दिल्याने एकाच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर मार्गावर वाकड येथे घडली. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी बस चालक सुजित विकास चव्हाण (वय ३२, रा. आनंदनगर, बदलापूर, ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा त्याच्या ताब्यातील शिवनेरी बस मुंबईच्या दिशेने घेऊन जात होता. दरम्यान, पन्नास वर्षीय व्यक्तीला बसने दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

सराईत रिक्षा चोर अटकेत
पिंपरी, ता. ३० : सराईत रिक्षा चोरट्याला अटक करण्यात वाकड पोलिसांच्या तपास पथकाला यश आले. या आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. दिलीपकुमार शालीग्राम विश्वकर्मा (वय २४, रा. ठोंबरे चाळ, तापकीरनगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. वाहन चोरी करणारा सराईत चोरटा काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार लकी बेकरी चौकात सापळा रचून दिलीपकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर चतुःशृंगी ठाण्यातील एक असे एकूण तीन रिक्षाचोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा जप्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com