दापोडीतील धम्मचक्र प्रवर्तन महाविहार ठरत आहे जीवन जगण्याचा मार्ग

दापोडीतील धम्मचक्र प्रवर्तन महाविहार ठरत आहे जीवन जगण्याचा मार्ग

धम्मचक्र प्रवर्तन महाविहारातून सत्तमार्गाचा शिकवण

विविध लोकल्याणकारी प्रकल्प; धम्म प्रचाराबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

पिंपरी, ता. ३ : बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे. या उक्तीप्रमाणे शहरात धम्माचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या माध्यमातून सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील त्रैलोक्य बौद्ध महासंघ या संस्थेअंतर्गत असलेल्या दापोडीतील धम्मचक्र प्रवर्तन महाविहारामध्ये लाखो लोक व्यसनमुक्त व अंधश्रद्धा मुक्त झाले आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गेल्या २५ वर्षांपासून या ठिकाणी चालू आहे. त्याचा लाभ हजारो विद्यार्थी घेत आहे. आत्तापर्यंत ४३८ विद्यार्थी शासकीय सेवेत विविध पदांवर सेवा करीत आहेत. हॉस्टेल प्रोजेक्ट, जीवक मेडिकल प्रकल्प, महिला प्रकल्प, सामाजिक प्रकल्प, चार ध्यान शिबिर प्रकल्प, बहुजन हिताय प्रकल्प लोककल्याणासाठी राबविले जात आहेत.

महाविहारातून धम्माचा प्रसार
त्रैलोक्य बौद्ध महासंघ आणि परदेशात त्रिरत्न बौद्ध महासंघ ही संस्था प्रथम लंडनमध्ये १९६७ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर भारतात सात एप्रिल १९७९ मध्ये पुण्यात स्थापन झाली. परदेशात ४८ देशांत या संस्थेच्या शाखा आहेत. भारतात ४२ शाखा आहेत. दापोडीतील धम्मचक्र प्रवर्तन महाविहाराचे १० मार्च १९९० मध्ये उद्‍घाटन भंते संघरक्षित यांच्या हस्ते झाले. या विहारात मनाची मलिनता शुद्ध करून आणि शरीरातील आळस काढून टाकून धम्ममित्र आणि धम्मचारी हे इतरांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात. त्यामुळे, लाखो लोक, व्यसनमुक्त झाले आहेत. लाखो लोक अंधश्रद्धा मुक्त झाले आहेत. जातीय मानसिकतेतून तसेच गरिबीतून मुक्त झाले आहेत. अहंगंड, न्यूनगंड, भीती, संशय या मानसिक विकारातून बाहेर पडले आहेत.

सर्व विश्र्वस्त महिला
धम्मचारिणी मैत्रिरत्ना या धम्मचक्र प्रवर्तन महाविहाराच्या चेअरवूमन आहेत. सर्व विश्वस्त महिला आहेत. सात महिला सध्या कार्यरत आहेत. विश्वस्त धम्मचक्र प्रवर्तन महाविहार तर, कर्मवज्र हे त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण, पुणे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी एक दिवसीय धम्मपरिचय शिबिर घेतले जाते. ते सर्वांसाठी असते. नव्याने शिकणाऱ्यांसाठी ध्यान वर्ग घेतले जातात. पाली विषयाचे वर्ग घेतले जातात. परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी गेली ३३ वर्ष या विहारातून कार्य केले जाते. डॉ. आंबेडकर ज्ञानमंदिर या प्रकल्पातून ग्रंथालय आणि जागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत. ग्रंथालयात बारा हजार ग्रंथ आहेत. सर्व धर्माचे ग्रंथ असून, अनेक वाचक त्याचा लाभ घेत आहे. येथून १२ विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून लाभ घेतला आहे.

परदेशी नागरिक दापोडीत
आपल्या दुःख चक्राचे कारण आपले दूषित मन आहे. आपणच आपले सुखकर्ते आणि दुःखकर्ते आहोत. कुशल कर्म केल्याने कुशल परिणाम येतो आणि अकुशल कर्म केल्याने अकुशल परिणाम येतो. हा कार्यकारण भाव सिद्धांत भगवान बुद्धाने सांगितला. तो परदेशी लोकांना पटला आणि ते मोठ्या प्रमाणात धम्म अभ्यास करून धम्म प्रचार जगभर करत आहेत. लोभ, मोह आणि द्वेष या तीन विषामुळे मानव जात दुःखी आहे. तसेच अहंकाराने आणि न्यूनगंडाची स्थिती, भीती, मनाचा सुख शोधण्यासाठी झालेला गोंधळ यामुळे मानव दुःखी आहे. त्यामुळे दुःख मुक्तीसाठी संस्थेचे विविध सामाजिक प्रकल्प आहेत.

विहारात नियमितपणे दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता सप्तांग पूजा, ध्यान आणि प्रवचन, दर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता साप्ताहिक धम्मवर्ग आदी नियमित कार्यक्रम सर्वांसाठी खुले असतात. उर्वरित कार्यक्रम धम्ममित्र आणि धम्मचारी यांच्यासाठी असतात. त्यांनी सखोल ध्यान सराव, सखोल धम्म अभ्यास आणि सखोल धम्म आचरण करावे या उद्देशाने त्यांचा अभ्यास वर्ग वेगळा भरविला जात आहे.

ही आहेत संस्थेची ध्येय, उद्दिष्ट्ये
- भगवान बुद्धाच्या विचाराचा अनुभव घेऊन इतरांना अनुभव
घेण्यासाठी प्रेरणा देणे
- आपल्या दुःख मुक्तीबरोबर इतरांची दुःख मुक्ती करणे
- आपल्या प्रगतीबरोबर इतरांची प्रगती करणे
- आपल्या सुखाबरोबर इतरांना सुखी करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com