परिचयाची वेळ संपली
अन् खरी ओळख झाली

परिचयाची वेळ संपली अन् खरी ओळख झाली

‘‘बंधू आणि त्यांच्या भगिनींनो, आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. भुजंगराव लांडगेसाहेब लाभले आहेत, यासारखं दुसरं भाग्य नाही. त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्यासोबत उठण्या- बसण्याचा ज्यांना लाभ मिळतो, ते खरे नशीबवान आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्या मालकीच्या बारमध्ये गेलो होतो. त्यावेळी त्यांच्याबरोबर ‘बसण्याची’ संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांच्या तोंडामधून जी काही रसवंती वाहत होती. त्यावरून त्यांचा परिचय करून देण्यासाठी मला दोन तासही पुरणार नाहीत, याची खात्री पटली. आम्ही त्यांना निमंत्रण दिल्यावर असल्या फुटकळ कार्यक्रमांना येण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, असे त्यांनी सुनावले. ‘आपलेच मतदार कार्यक्रमाला उपस्थित आहेत.’ असं आम्ही त्यांना सांगितल्यावर ‘निवडणुका अजून लांब आहेत. त्यामुळे मतदारांना मी हिंग लावून विचारत नाही.’ असे त्यांनी सांगितले. इतका स्पष्टवक्ता नेता माझ्या पाहण्यात दुसरा नाही. गौतमी सातारकर या नृत्यांगना कार्यक्रमाला येणार असल्याचे सांगितल्यावर त्यांची कळी खुलली. ‘मतदार माझा देव आहे. देवासाठी मी वाट्टेल ते करील’, असे सांगून कार्यक्रमाला येण्यास त्यांनी होकार दिला. निवडणूक लांब असतानाही हल्लीच्या काळात मतदारांचा एवढा विचार कोण करतो?
‘आपण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहतो’, असं त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं व जाताना कोठे कोठे फ्लेक्स उभारावयाचे व त्यावर आपला कोणता फोटो लावायचा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. खरं तर शहरात फ्लेक्स उभारण्यावर त्यांचा मोठा विरोध आहे. फ्लेक्स हटाव या मोहिमेसासाठी त्यांनी शहरभर दोन हजार फ्लेक्स लावले होते. ‘‘माझे फ्लेक्स उभारण्यासाठी संस्थेकडे पैसे आहेत का?’’ असं त्यांनी विचारलं. आम्ही नकारार्थी मान डोलावल्यावर त्यांनी लगेचच देणगीही दिली. एवढा दानशूर व कर्णाचा अवतार असलेली व्यक्ती हल्ली कोठे आढळते?
साहेबांना लोककलेची फार आवड आहे. तमाशा आणि आर्केष्टामधील अनेक गरीब महिलांना त्यांनी बारमध्ये रोजगार देऊन, नृत्यकलेला प्रोत्साहन दिलंय. त्यातील चार- पाच बेघर महिलांना त्यांनी स्वतःच्या खर्चातून फ्लॅट दिलाय. शिवाय त्यांच्या मुला-बाळांचा खर्चही ते प्रेमाने करतात. हल्लीच्या काळात गरीब महिलांसाठी कोण करतं एवढं? एवढी समाजसेवा करूनही त्यांना प्रसिद्धी नको असते. त्यामुळे त्यांनी ही बाब त्यांच्या बायकोलाही कळू दिली नाही. प्रसिद्धीपासून एवढी दूर राहणारी व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही.
खरं तर लांडगेसाहेबांना राजकारणात यायचं नव्हतं. सुरवातीला ते एक प्रामाणिक व्यावसायिक होते. आपल्या व्यवसायातून गोर- गरिबांची सेवा व्हावी, त्यांची तहान भागवावी, एवढाच त्यांचा प्रामाणिक हेतू होता. मात्र, हातभट्टीच्या दारूच्या धंद्यामुळे पोलिसखातं त्यांना त्रास देऊ लागलं. त्यांच्यापासून वाचण्यासाठी ते राजकारणात आले. आता पोलिसच त्यांना सलाम ठोकतात.
राजकारणात आल्यानंतरही साहेबांचे मन एका पक्षात रमेना. त्यामुळे अनेक पक्षात ते राहून आले. राजकारणात हल्ली पक्षनिष्ठा नावालाही राहिली नाही, जिकडे तिकडे स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे, असं ते अनुभवाच्या जोरावर म्हणतात, ते उगीच नाही. मृत व्यक्तींना जिवंत करून, स्वतःला मतदान करून घेण्याचा चमत्कार ते दर निवडणुकीत करतात. मात्र, एवढा मोठा चमत्कार करूनही ते कधीही त्याचा गाजावाजा करीत नाहीत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा नाहीतर काय? शिवाय एका मताला तीन- चार हजार रुपये भाव फोडून मतदारांची गरिबीही हटवतात. शिवाय निवडणूक होईपर्यंत प्रत्येकाच्या ओल्या पार्टीची सोय आपल्या बारवर करतात. हल्लीच्या काळात मतदारांची एवढी काळजी कोण घेतो? लोकांना चांगल्या घरात राहता यावं, या एकमेव उद्देशामुळे ते बिल्डर झाले. महापालिकेच्या परवानगीची वाट न पाहता, अगदी कमी जागेत, दाटीवाटीत त्यांनी इमारती बांधल्या आहेत. कमी पैशांत लोकांना घर मिळावं, हाच त्यांचा उद्देश असतो. एवढं बोलून मी साहेबांचा परिचय करून देणं थांबवतो.
धन्यवाद !’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com