‘मॉडेल स्कूल’चा जूनमध्ये श्रीगणेशा

महापालिकेचे नियोजन; विद्यार्थ्यांच्या सकारात्मक, गुणात्मक बदलावर भर

‘मॉडेल स्कूल’चा जूनमध्ये श्रीगणेशा महापालिकेचे नियोजन; विद्यार्थ्यांच्या सकारात्मक, गुणात्मक बदलावर भर

पिंपरी, ता. ६ : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक, गुणात्मक बदल व्हावा, यावर आगामी शैक्षणिक वर्षापासून भर दिला जाणार आहे. त्याअंतर्गत ३७ शाळांची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड केली आहे. त्यांची रंगरंगोटी त्याचबरोबर शौचालय, ग्रंथालय, पिण्याचे पाण्याची सुविधा, वर्गखोल्या, मैदान, सुरक्षाभिंती, प्रयोगशाळा, स्मार्ट स्कूल, क्रीडा अशा सुविधा पुरविण्याची पूर्तता सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा दिल्या जाणार आहेत.
महापालिका शाळांचे ‘पब्लिक स्कूल’ असे नामकरण केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बोधचिन्ह (लोगो) आणि घोषवाक्य ‘ज्ञानमेव शक्तिः’ निश्चित केले आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शाळांचे नामफलक बदलण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल सर्जनशीलता व समस्या निवारण कौशल्ये वाढीसाठी पाय जॅम फाउंडेशनसोबत महापालिकेने करार केला आहे. या फाउंडेशनकडून आठ मॉडेल स्कूल्समध्ये ‘लॅब्स’ उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना कोडिंग व समस्या निवारण कौशल्याचे प्रशिक्षण, कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. सर्व प्राथमिक शाळांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटरही असेल.

क्रीडा प्रकारांवर भर
महापालिकेच्या ६२ टक्के प्राथमिक शाळांना मैदान किंवा क्रीडांगण उपलब्ध आहेत. हॉकीमध्ये ३२७ मुलांची टेस्ट झाली आहे. ५० मुले व ५० मुली असे संघ तयार केले आहेत. सकाळच्या सत्रात सहा व दुपार सत्रात सहा शाळांचे विद्यार्थी हॉकी स्टेडिअमवर सरावासाठी येतील. क्रीडा प्रबोधिनीत ॲडमिशनकरीता महापालिका शाळेचे ९४ विद्यार्थी निवडले आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात क्रीडा सुविधा असलेल्या ३२ शाळा तयार करण्यावर भर आहे. नांदेड शहराप्रमाणे टेनिस कोर्ट तयार केले जाणार आहेत. महापालिकेच्या शाळांमधील खेळांची आवड व कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनी, तसेच क्रिकेट, कुस्ती, आर्चरी ॲकॅडमीमध्ये प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एक मल्टी टर्फ स्कूल विकसित करण्याचे नियोजन आहे. सीएमईमध्ये रोईंगची आंतरराष्ट्रीय सुविधा असून, विद्यार्थ्यांना रोईंगसाठी तयार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

शून्य कचरा निर्मितीच्या आठ शाळा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आसरा सोशल फाउंडेशनला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील एक याप्रमाणे आठ शाळांमध्ये शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात मोहननगर मुले, चिंचवडगाव मराठी माध्यम, जाधववाडी कन्या, वाकड कन्या, बोपखेल इंग्रजी माध्यम, तळवडे, खिंवसरा पाटील मुले शाळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या शाळांचा समावेश आहे. शून्य कचरा संकल्पना राबविण्याची व कचरा संकलन केंद्र कंपोस्ट पीट उभारण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. इतर शाळांमध्ये टप्याटप्याने कार्यवाही केली जाणार आहे.

प्रगतिपथावर...
- युरेका फोर्बस कंपनीचा यूव्ही वॉटर फिल्टर सर्व शाळांमध्ये बसवणे व बंद वॉटर फिल्टर दुरुस्त करणार
- जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, फुगेवाडी, वाल्हेकरवाडी शाळा इमारतींचे बांधकाम जूनपर्यंत; कासारवाडीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल
- डाएट, एससीआरटी, आकांक्षा या संस्थांद्वारे वेळापत्रक आणि चित्रे, रंगसंगती, कला, क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे वार्षिक कॅलेंडर
- विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नावीन्यपूर्ण विचार वाढीसाठी जल्लोष शिक्षणाचा स्पर्धा
- पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याची रक्कम थेट बॅंक खात्यात मिळेल
- जास्त पटसंख्येच्या ३२ शाळांमध्ये १५ जूनपर्यंत पूर्णवेळ क्रीडा व कला शिक्षकांची नियुक्ती करणार

प्रत्येक वर्गात ग्रंथालय

- प्रत्येक वर्गात वेगळे कपाट ठेवून वेगवेगळ्या विषयांची पुस्तके
- विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार एका विद्यार्थ्यामागे पाच पुस्तके
- सुरवातीला ५० प्राथमिक शाळांमधील प्रत्येक वर्गात एक ग्रंथालय
- मुख्याध्यापकांशी चर्चा करून पुस्तकांची यादी व संख्या ठरवणार

महापालिका शाळा ः १२८
शाळांच्या इमारती ः ८७
निवडलेल्या मॉडेल स्कूल ः ३७

क्वॉलिटी कौंसिल ऑफ इंडिया यांच्यासोबत तीन वर्षांसाठी करारनामा केला असून, विद्यार्थी व शिक्षकांचे १०० टक्के मूल्यमापन करणार आहे. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन सहलीचे आयोजन केले जाईल. त्याअंतर्गत इस्रो, डीआरडीओ, सायन्स पार्क, संग्रहालये, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक स्थळांना भेटी देतील.
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com