भाटनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाटनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून 
दोन चोरीच्या दुचाकी जप्त
भाटनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

भाटनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

sakal_logo
By

पिंपरी : दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलिस फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक अल्पवयीन मुलगा मोटार सायकल चोरून त्या वाहनावर भाटनगर येथे फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी मुलाचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, केरप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, जयवंत राऊत, आतिष कुडके, शिवाजी मुंढे, अजित सानप, उद्धव खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आकुर्डीत साक्ष न देण्यासाठी मागितली खंडणी
मुंबई येथील केसमध्ये साक्ष द्यायची नाही, असे म्हणून पाच कोटींची मागणी करण्यात आली. हा प्रकार निगडी व आकुर्डी येथे २९ एप्रिल रोजी घडला. याप्रकरणी दीपक भास्कर फटांगरे (रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष गायकवाड (रा. आकुर्डी), रविराज विकास ताकवणे (रा. निगडी), अविनाश देवकर (रा. आकुर्डी) व त्याचे ४० ते ५० साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मुंबई केसमध्ये साक्ष देऊ नये, यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीतील कामगारांना कोंडून ठेवले. तसेच, सीसीटीव्ही डिव्हिआर काढून घेतला. कंपनीच्या ड्रॉवरमधून पाच लाख रुपये काढून घेतले. फिर्यादी यांना आकुर्डी येथे गाठून शिवीगाळ व मारहाण करीत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोशीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी साडेसात वाजता देहू-आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्ती, मोशी येथे घडला आहे. अतिन्द्र अरबिंदू मल्लीक (वय २४, रा. चिखली) यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजीतकुमार महेश सहानी (वय २३, रा. नेवाळेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील अरबिंदू मल्लीक त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार मल्लीक यांचा मृत्यू झाला. यावरून डंपरचालक संजीतकुमार याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपीनगरमध्ये खिडकी फोडून सव्वा लाखाची चोरी
गॅलरीच्या खिडकीतून प्रवेश करत चोरट्यांनी घरातील दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तळवडे येथील रुपीनगर परिसरातील द्वारका सोसायटी येथे उघडकीस आली. याप्रकरणी महेश चंद्रकांत जवळगी (वय ३८, रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या गॅलरीच्या खिडकीतून चोरट्याने प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून ७२ हजार ५०० रुपये व टेबलवर ठेवलेल्या १५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण एक लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

लोखंडी रॉडने मारहाण करीत कारची तोडफोड
पैसे न दिल्याने दोघांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच, कारची तोडफोड करीत गोंधळ घातला. ही घटना बुधवारी (ता. ३) चाकण येथे घडली. याप्रकरणी धनंजय सुरेश पानसरे (वय २७, रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतीक शहाजी जाधव (वय २०, रा. खेड), चंदू बिराजे हाजारे (वय २१, रा. खेड) यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार कुल्हाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्राला त्याच्या गाडीची चावी देत असताना आरोपी तेथे आले. त्यावेळी फिर्यादीला एक लाख रुपये मागितले, फिर्यादी यांनी त्याला
नकार दिला असता. आरोपींनी त्यांच्याकडील लोखंडी टॉमीने फिर्यादीला मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
भरधाव दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात १७ एप्रिल रोजी पोलिस आयुक्‍तालयासमोरील आकुर्डी-चिंचवड रस्त्यावर प्रेमलोक पार्क येथे सकाळी नऊ वाजता झाला. मौलाली शेख उमर मुल्ला (वय ४५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल रज्जाक जहांगीर पठाण (वय २४, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कुटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाली शेख उमर मुल्ला त्यांच्या मुलासह दुचाकीवरून आकुर्डी-चिंचवड रस्त्याने जात होते. दरम्यान, प्रेमलोक पार्क येथे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत, लाल रंगाच्या स्कुटी चालकाने मुल्ला यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुल्ला यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.