
स्वतःच आनंदाचा स्त्रोत बना ः डॉ. राजीव नगरकर
पिंपरी, ता. ८ ः ‘‘मीच माझ्या आनंदाचा स्रोत आहे, असे ठरवले की, जगात तुम्हाला कोणीही दु:खी करू शकत नाही,’’ असा विश्वास समुपदेशक डॉ. राजीव नगरकर यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड यांच्यातर्फे विरंगुळा केंद्रात आयोजित वासंतिक व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘आनंदी जीवन’ विषयावर ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कोषाध्यक्ष अरविंद जोशी उपस्थित होते. डॉ. नगरकर म्हणाले, ‘‘आपण दुसऱ्यावर हसल्याचे सहज आठवते, कधीतरी स्वतः वरही हसतो; पण स्वतः साठी आवर्जून हसायला हवे. नेहमी करीत असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्यास आनंद मिळतो. जीवनात परिस्थितीचा स्वीकार महत्त्वाचा असतो. दु:खात किंवा संकटात मीच का? असा विचार मनात येतो; अशा वेळी समर्थ रामदास स्वामी यांचे, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ हे वचन लक्षात ठेवा. बहुश्रुत असणे हा आनंदी जीवनाचा पाया आहे. माणसाने बदलायला शिकले पाहिजे. मी जसा वागतो; तसा दुसरा माझ्याशी वागला तर चालेल का? असे अंतर्मुख होऊन मनाला विचारा. आनंदी राहायला सर्वांनाच आवडते; परंतु आपला आनंद दुसऱ्या व्यक्तींच्या क्रिया, प्रतिक्रियांवर अवलंबून असतो.’’ रत्नमाला खोत आणि मंगला दळवी यांच्या त्रिवार ओंकाराने प्रारंभ करण्यात आला. गोपाळ भसे यांनी परिचय करून दिला. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले.
सुखी जीवनाचा मूलमंत्र
- राग वारंवार प्रदर्शित करू नका
- मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका
- स्वतःला त्रास करून घेऊ नका
- दु:खाचे मूळ असलेला अहंकार सोडा
- स्वतःला कमी लेखू नका
- आनंदी राहा, प्रत्यकात आनंद शोधा